Join us  

सलमान खान मोहनीश बहलची लेक प्रनूतनला या चित्रपटाद्वारे करणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 1:04 PM

आता सलमान आपला खास मित्र मोहनीश बहलची मुलगी प्रनूतनला आगामी चित्रपटात लाँच करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत.

बॉलिवूडचा दंबग खान सलमानने बऱ्याच नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी मिळवून दिली आहे. कॅटरिना कैफ, डेझी शहा, सोनाक्षी सिन्हा, झरीन खान, सूरज पंचोली, आयुष शर्मा, अथिया शेट्टी अशा अनेक कलाकारांना सलमानने बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. पण या व्यतिरिक्त अनेक नवोदित कलाकारांना येत्या वर्षभरात सलमान बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने वरिना हुसेन, झहीर इक्बाल या दोन नवोदितांना लाँच करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता सलमान आपला खास मित्र मोहनीश बहलची मुलगी प्रनूतनला आगामी चित्रपटात लाँच करणार आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. मोहनीशची मुलगी प्रनूतनला सलमान बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. या चित्रपटात प्रनूतनसोबतच आणखी एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे झहीर इक्बाल. झहीरला सलमान लाँच करणार याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियामध्ये होती. प्रनूतन आणि झहीरच्या या चित्रपटाची निर्मिती ‘सलमान खान फिल्म्स’, मुराद खेतानी आणि अश्विन वर्दे करणार आहेत तर नितीन कक्कर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग काश्मीरमध्ये पार पडणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला या महिन्यात सुरुवात होणार आहे. 

मोहनीश बहल आणि सलमान या दोघांमधलं मैत्रीचं नातं खूपच जुनं आहे. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है यासांरख्या चित्रपटात सलमान आणि मोहनीशने एकत्र काम केले आहे. हम आपके है कौन, हम साथ साथ है या दोन्ही चित्रपटांत मोहनीशने सलमानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. सध्या प्रनूतनचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून नेटिझन्स तिची तुलना दिग्गज अभिनेत्री आणि तिची आजी नूतन यांच्यासोबत करत आहेत. 

प्रनूतननंतर सलमान बॉडीगर्ड शेराचा मुलगा टायगरलाही बॉलिवूडमध्ये आणण्याच्या विचारात आहे. याचबरोबर महेश मांजरेकरच्या मुलीला देखील येणाऱ्या काळात सलमान बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :मोहनिश बहल