Join us  

सलमान खान सांगतोय, या कारणामुळे ट्युबलाईटला मिळाले नाही यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 9:00 PM

नोटबुक या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच सलमानने पत्रकारांसोबत गप्पा मारल्या. यावेळी सलमानने त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत तसेच त्याच्या प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांविषयी गप्पा मारल्या. 

ठळक मुद्देट्युबलाईट हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणे चुकीचे होते. ईदला प्रदर्शित होणारा चित्रपट हा हलकाफुलका असावा असे प्रेक्षकांना वाटत होते. त्याच अपेक्षेने ते ट्युबलाईट हा चित्रपट देखील पाहायला गेले होते. पण या चित्रपटाची पटकथा खूपच वेगळी होती.

ट्युबलाईट या चित्रपटात सलमान खानची मुख्य भूमिका असली तरी या चित्रपटाला त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करता आले नाही. या चित्रपटाची गणना सलमानच्या फ्लॉप चित्रपटांमध्ये होते. ट्युबलाईट या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश न मिळण्यामागे एक खास कारण आहे आणि हे कारण स्वतः सलमान खाननेच सांगितले आहे. नोटबुक हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात जहीर झक्बाल आणि प्रन्यूतन बहल यांच्या मुख्य भूमिका आहेत. जहीर आणि प्रन्यूतन यांचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच सलमानने पत्रकारांसोबत गप्पा मारल्या. यावेळी सलमानने त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत तसेच त्याच्या प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांविषयी गप्पा मारल्या. 

सलमानला या मुलाखतीच्या दरम्यान ट्युबलाईट या त्याच्या चित्रपटाच्या अपयशामागचे कारण विचारण्यात आले. त्यावर सलमानने उत्तर दिले की, ट्युबलाईट हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणे चुकीचे होते. ईदला प्रदर्शित होणारा चित्रपट हा हलकाफुलका असावा असे प्रेक्षकांना वाटत होते. त्याच अपेक्षेने ते ट्युबलाईट हा चित्रपट देखील पाहायला गेले होते. पण या चित्रपटाची पटकथा खूपच वेगळी होती. हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार असे ज्यावेळी मला सांगण्यात आले, त्याचवेळी मी या गोष्टीचा विरोध केला होता. मी त्यावेळी माझ्या मतावर ठाम राहायला पाहिजे होते असे मला वाटते. ट्युबलाईट दुसऱ्या कोणत्या शुक्रवारी प्रदर्शित झाला असता तर फरक पडला असता. आज मोठ्या पडद्यावर आणि डिजिटल माध्यमात या चित्रपटाला चांगली पसंती मिळत आहे. 

सलमान खान लवकरच प्रेक्षकांना कॅटरिना कैफसोबत भारत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट यंदाच्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या टीझरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी सलमानला खात्री आहे.

टॅग्स :सलमान खान