Join us  

सलमान खानच्या घरात पोहोचला कोरोना, संपूर्ण कुटुंब झाले क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 10:22 AM

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा जोर कमी झाला होता. मात्र आता कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ दीर्घकाळापासून चर्चेत आहे आणि चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा जोर कमी झाला होता. मात्र आता कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. आता बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या घरी कोरोनाची एन्ट्री झाली आहे.  भाईजानच्या घरातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात सलमानच्या ड्रायव्हरचाही समावेश आहे.घरातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर सलमानने स्वत:ला आयसोलेट केले आहे. अख्खे खान कुटुंबही क्वारंटाइन झाले आहे. सलमान खान सध्या ‘बिग बॉस’चा 14 वा सीझन होस्ट करतोय. अशात येत्या एपिसोडमध्ये तो दिसणार की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात सलमान सुमारे दोन महिने त्याच्या फार्महाऊसवर मुक्कामाला होता. घरात म्हातारे आईवडिल असल्याने त्यांना कोरोनाचा कुठलाही धोका नको, म्हणून जाणीवपूर्वक त्याने स्वत:चा मुक्काम फार्महाऊसवर हलवला होता. मात्र लॉकडाऊनचे नियम शिथील होताच तो घरी परतला होता. शिवाय त्याने कामही सुरु केले होते.  शूटींगला परवानगी मिळताच त्याने बिग बॉस 14 चे शूटींग सुरू केले होते. शिवाय ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाच्या शूटींगवरही तो परतला होता. या सिनेमाचे शूटींग लॉकडाऊनमुळेच रखडले होते.

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ दीर्घकाळापासून चर्चेत आहे आणि चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी ईदच्या निमित्ताने हा सिनेमा रिलीज होणार होता, पण आधी चित्रपटाचे शूटिंग थांबले आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे थिएटर बंद झाले, त्यानंतर रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली .या सिनेमाची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाही आणि आता २०२१मध्ये ईदच्या निमित्ताने राधे रिलीज होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

टॅग्स :सलमान खान