Join us  

हे ढोंग म्हणजे सुशांतच्या आत्म्याचा अपमान...! बॉलिवूडवर सैफ अली खान संतापला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 11:35 AM

वाचा, काय म्हणाला सैफ अली खान

ठळक मुद्देसैफची लेक सारा अली खान हिने सुशांतसोबतच डेब्यू केला होता.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कंगना राणौत, विवेक ओबेरॉय यांच्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानही बॉलिवूडवर भडकला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्यांच्याबद्दल पोकळ सहानुभूती व्यक्त करणा-यांना त्याने लाथाडले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सैफ बोलला. ‘सुशांतच्या मृत्यूची बातमी हृदय हेलावणारी आहे. पण आता तो या जगातून गेल्यानंतर काही लोक ढोंग करत आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी येताच बॉलिवूडच्या काही लोकांनी त्यावर इमोशनल पोस्ट केल्यात. माझ्यामते, काही मंडळी या घटनेचा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापर करत आहेत. मग ते पोकळ दु:ख व्यक्त करणे असो किंवा एखादा मुद्दा लावून धरणे असो. सोशल मीडियावर लोक न थांबता बोलत आहेत आणि हे लज्जास्पद आहे. मी सुशांतचा मनापासून आदर करतो. सोशल मीडियावर देखावा करण्यापेक्षा त्याच्या मृत्यूवर एक दिवसांचे मौन करणे, स्वत:चे आत्मपरिक्षण करणे अधिक योग्य होईल. जे लोक त्याच्या मृत्यूवर अश्रू ढाळत आहेत, प्रत्यक्षात त्यांना कधी त्याची पर्वा नव्हती. इंडस्ट्रीत असे अनेक लोक आहेत, ज्यांना कोणाचीही पर्वा नाही. सुशांतच्या मृत्यूनंतरचे ढोंग मी त्याचा अपमान समजतो. त्या आत्म्याचा हा अपमान आहे, जी निघून गेली,’असे सैफ म्हणाला. 

सैफची लेक सारा अली खान हिने सुशांतसोबतच डेब्यू केला होता. ‘केदारनाथ’ या सिनेमात सुशांत व साराची जोडी दिसली होती. हा साराचा पहिला सिनेमा होता. सुशांतच्या मृत्यूनंतर साराला जबर धक्का बसला आहे. ती अद्यापही त्याच्या मृत्यूचे दु:ख पचवू शकलेली नाही.

टॅग्स :सैफ अली खान सुशांत सिंग रजपूत