Join us  

सेक्रेड गेम्स २ च्या लाँचिंगची तारीख पुढे ढकलली, या महिन्यात पाहायला मिळणार ही वेबसिरिज?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 12:28 PM

सेक्रेड गेम्स २ ही वेबसिरिज सुरू व्हायला प्रेक्षकांना अजून काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.

ठळक मुद्देही वेबसिरिज ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन प्रसिद्ध वेबसिरिजमध्ये काही महिन्यांचे अंतर असावे यासाठी हा बदल करण्यात आला आहे. 

सेक्रेड गेम्सच्या यशानंतर या वेबसिरिजचे चाहते सेक्रेड गेम्स २ ची आतुरतेने वाट पाहात आहेत. सेक्रेड गेम्स २ कधी सुरू होणार याविषयी नेटफ्लिक्सने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना संकेत दिला होता. त्यांनी १० मे ला इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे सेक्रेड गेम्स २ पुढील २५ दिवसांत सुरू होईल असा अंदाज लावण्यात येत आहे. पण हे २५ दिवस उलटून गेल्यानंतरही ही वेबसिरिज सुरू झाली नसल्याने आता ही वेबसिरिज कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची सगळेच आतुरतेने वाट पाहात आहेत. 

सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सेक्रेड गेम्स २ ही वेबसिरिज सुरू व्हायला प्रेक्षकांना अजून काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे. मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ अली खान आणि नवाझुद्दीन सिद्दकी यांची मुख्य भूमिका असलेला सेक्रेड गेम्स या वेबसिरिजचा दुसरा भाग २८ मे ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता ही वेबसिरिज ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन प्रसिद्ध वेबसिरिजमध्ये काही महिन्यांचे अंतर असावे यासाठी हा बदल करण्यात आला आहे. 

तसेच सैफ आणि नवाझ दोघेही त्यांच्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याने या वेबसिरिजच्या लाँचिंगची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सैफ सध्या जवानी जानेमन या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून नवाझ बोल चुडियाँच्या चित्रीकरणात बिझी आहे. त्यामुळे त्या दोघांकडे सध्या अजिबातच वेळ नाहीये. सैफने तर जवानी जानेमन या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढत भारत-पाकिस्तान मॅचला हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्यासोबत आपल्याला या चित्रपटात त्याच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या आलिया फर्निचरवालाला पाहायला मिळाले होते. मॅच पाहिल्यानंतर सैफने महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवासोबत फोटोदेखील काढले होते. जवानी जानेमन हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटात सैफची पत्नी करिना कपूर कॅमिओ रोलमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

 

‘सेक्रेड गेम्स 2’च्या या प्रोमोत सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत रणवीर शौरी आणि कल्की कोच्लिन दिसले होते. पहिल्या सीझनमध्ये नवाजुद्दीन आणि पंकज त्रिपाठी यांची भूमिका प्रेक्षकांना कमालीची भावली होती. दुसऱ्या सीझनमधील त्यांचे नवे लूक पाहून चाहत्यांचे क्रेज वाढले. 

टॅग्स :सॅक्रेड गेम्ससैफ अली खान नवाझुद्दीन सिद्दीकी