Join us  

या इतक्या दु:खी, कष्टी का? सब्यसाची पुन्हा ट्रोल, 'Unhappy' मॉडेल्स पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 1:53 PM

काही दिवसांपूर्वीच मंगळसूत्राच्या जाहिरातीवरून बॉलिवूडचे दिग्गज फॅशन डिझाईनर Sabyasachi ट्रोल झाले होते. आता पुन्हा एकदा सब्यसाची ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.

अनेकदा  क्रिएटीव्हिटीच्या नावावर नको ते खपवलं जातं आणि यातून नको ते वाद जन्माला येतात. काही दिवसांपूर्वीच मंगळसूत्राच्या जाहिरातीवरून बॉलिवूडचे दिग्गज फॅशन डिझाईनर सब्यसाची (Sabyasachi ) ट्रोल झाले होते. जाहिरात मंगळसूत्रावी की अंतर्वस्त्राची, असा बोचरा सवाल ट्रोलर्सनी त्यांना केला होता. आता पुन्हा एकदा सब्यसाची आपल्या ज्वेलरी कलेक्शनच्या जाहिरातीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.सब्यसाची यांनी नुकतंच फाईन ज्वेलरीचं ऑटम/ विंटर 2021 हे नवं कलेक्शन लॉन्च केलं. सोशल मीडियावर या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली आहे. जाहिरातीतील मॉडेल्स फाइन ज्वेलरीच्या अनकट डायमंड, ओपल्स, पर्ल्स, कलर्ड स्टोनसह वेगवेगळ्या डिझाईन घालून दिसत आहेत. खरं तर दागिने म्हटल्यावर कुठल्याही स्त्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतो. पण सब्यसाची यांच्या जाहिरातीतील मॉडेल्स रूक्ष व दु:खी चेह-यानं दागिन्यांसह पोझ देत आहेत. मुळात हीच गोष्ट नेटकऱ्यांना खटकली आहे.  

एका जाहिरातीत तीन मॉडेल्स दाखवल्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची खिन्नता दिसतेय. ज्वेलरी अ‍ॅडमधील मॉडेल्स इतक्या दु:खी का? हीच गोष्ट नेटकऱ्यांना पडला आहे. यावरून सब्यसाची यांना ट्रोल केलं जातंय.

सब्यसाची यांचे दागिने कदाचित डिप्रेस महिलांसाठी आहेत, अशी कमेंट एका युजरने केली आहे. या इतक्या दु:खी का? असा सवाल एका युजरनं केला आहे. दागिने थोडे जड झाले असतील, म्हणून बिचाऱ्या हसणं विसरल्यात, अशी कमेंट एका युजरने केली आहे. या फोटोंवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, पैशानं तुम्ही आनंद खरेदी करू शकत नाही. त्यामुळे इतक्या महाग ज्वेलरीवर पैसे खरेदी करण्याची गरज नाही, अशा शब्दांत एका युजरने सब्यसाची यांना ट्रोल केलं आहे. सब्यासाची हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यांसाठी त्यांनी कपडे डिझाइन केले आहेत. कपड्यांसोबतच सब्यासाची ब्रँडचे दागिनेसुद्धा त्यांच्या अनोख्या डिझाइनमुळे चर्चेत असतात. सुंदरतेची वेगळी परिभाषा मांडण्यासाठी सब्यासाची यांच्या ब्रँडच्या फोटोशूटमध्ये अनेकदा सावळ्या आणि स्थूल मॉडेल्सनाही प्राधान्य दिलं जातं.

टॅग्स :सब्यसाची