Join us

​सोशल मीडियावर पसरली कन्नड अभिनेत्री जयंती यांच्या निधनाची अफवा, कुटुंबीयांनी व्यक्त केली नाराजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 10:16 IST

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री जयंती यांच्या मृत्यूची बातमी मंगळवारी व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली देऊ लागले. ...

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री जयंती यांच्या मृत्यूची बातमी मंगळवारी व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली देऊ लागले. पण यादरम्यान जयंती यांच्या निधनाची बातमी अफवा असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले. ही अफवा कुणी पसरवली, हे तूर्तास स्पष्ट झालेले नाही. तथापि जयंती यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. जयंती यांच्यावर बेंगळुरूच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत जलद सुधारणा होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी निव्वळ अफवा आहे, असे कुटुंबीयांनी स्पष्ट केले. ७३ वर्षांच्या जयंती दीर्घकाळापासून क्रोनिक अस्थमाने पीडित आहेत. रविवारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना बेंगळुरूच्या एका रूग्णालयात भरती करण्यात आले. सुमारे तीन दशकांपासून जयंती यांना अस्थमाचा त्रास आहे.६ जानेवारी १९४५ रोजी कर्नाटकमध्ये जयंती यांचा जन्म झाला. बालकलाकार म्हणून त्यांनी आपली अभिनयाची कारकिर्द सुरु केली. पुढे अभिनेत्री, निर्माती आणि गायिका अशा अनेक क्षेत्रात त्यांनी हात आजमावला. ६० ते ८० च्या दशकापर्यंत दक्षिण भारतीय सिनेमातील आघाडीची अभिनेत्री अशी जयंती यांची ओळख राहिली.  या काळात त्यांनी बॉलिवूडच्या तीन चित्रपटांतही काम केले. ‘तीन बहुरानियां’,‘तुमसे अच्छा कौन है’,‘गुंडा’ या बॉलिवूडपटात त्या दिसल्या. कन्नडसह हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू चित्रपटांतही त्यांनी काम केले. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांत काम केले. कन्नड चित्रपटसृष्टीने त्यांना ‘अभिनय शारदे’ उपाधीने सन्मानित केले. जेमिनी गणेशन, एमजीआर आणि जयललिता अशा अनेक सुपरस्टारसोबत त्यांनी काम केले. कन्नड अभिनेते डॉ. राजकुमार यांच्यासोबत जयंती यांनी ४५ चित्रपट केलेत. हा एक विक्रम आहे.