Join us

ऋषी कपूर पुन्हा अडकले नव्या वादात, एका आरजेला पाठवले खासगी मेसेज.... सोशल मीडियावर चिंटू कपूरविरोधात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 13:13 IST

अभिनेता ऋषी कपूर आणि वाद हे जणू काही समीकरणच बनलं आहे. वादग्रस्त ट्विटमुळे गेल्या काही महिन्यांत ऋषी कपूर या ...

अभिनेता ऋषी कपूर आणि वाद हे जणू काही समीकरणच बनलं आहे. वादग्रस्त ट्विटमुळे गेल्या काही महिन्यांत ऋषी कपूर या ना त्या वादात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानबाबतच्या एका ट्विटमुळे ऋषी कपूर यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. मात्र या वादानंतर ऋषी कपूर यांनी सोशल मीडियापासून काहीसं दूर राहणंच शहाणपणाचं समजलं. सध्या त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर कोणतंही ट्विट पाहायला मिळत नाही. मात्र ऋषी कपूर आणि वाद हे नातं असं काही बनलं आहे की एक नवं प्रकरण समोर आलं आहे. यावेळी ऋषी कपूर यांनी ट्विटरवर कोणतीही पोस्ट केलेली नसून वैयक्तीक मेसेजमुळे ते अडचणीत सापडलेत. एका महिलेला केलेल्या अभद्र मेसेजमुळे ऋषी कपूर नव्या वादात अडकले आहेत. ही महिला म्हणजे आरजे सुचित्रा त्यागी. ऋषी कपूर यांनी सुचित्रा त्यागीला एकामागून एक मेसेज करुन अपमानित केले. याच चॅटचा स्क्रीनशॉट आरजे सुचित्रा हिने ट्विटरवर शेअर केला आहे.काही दिवसांपूर्वी हॉलीवुड अभिनेत्री बेयॉन्से हिने प्रेगनन्सी फोटो शूट केले होते. या फोटोची ऋषी कपूर यांनी खिल्ली उडवली होती. त्यांनी फुल खिले है गुलशन गुलशन अशी प्रतिक्रिया बेयॉन्सेच्या फोटोवर दिली होती. ऋषी कपूर यांची हीच प्रतिक्रिया आरजे सुचित्राला काही रुचली नाही. या फोटोंची खिल्ली उडवावी असं काहीही नसल्याने ऋषी कपूर यांचं कृत्य सुचित्राला काही पटलं नाही. त्यामुळे नॉट सो फनी असं उत्तर तिने ऋषी कपूर यांच्या कमेंटला दिलं. सुचित्राचं हे उत्तर पाहून ऋषी कपूर चांगलेच खवळले. त्यांनी यावर ट्विटरवरुन काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यावेळी त्यांनी वैयक्तिक (पर्सनालाईज्ड) मेसेजचा आधार घेतला. तुझ्यासारख्या मुलीकडे सेन्स ऑफ ह्युमर नावाची गोष्टच नाही, मग मला फॉलो करण्याची गरज काय ? असा मेसेज ऋषी कपूर यांनी सुचित्राला केला. यावर मी तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आदर करते, मला वैयक्तिक मेसेज करु नका असा रिप्लाय सुचित्राने ऋषी कपूर यांना दिला. यावरही ऋषी कपूर गप्प बसले नाहीत. तुला चांगल्या झोपेची गरज आहे. सकाळी उठशील तेव्हा कॉफी घे. तू जसा विचार करतेस त्याहून अधिक सुंदर हे जग आहे, मला माफ कर मी तुला ब्लॉक करत आहे असा रिप्लाय ऋषी कपूर यांनी सुचित्राला पाठवला. याच संभाषणाचा स्क्रीन शॉट सुचित्राने ट्विटरवर शेअर केला आहे.यानंतर ऋषी कपूर यांच्यावर नेटिझन्सकडून संताप व्यक्त होतोय. ऋषी कपूर यांना लाज वाटली पाहिजे. दुस-यांना सल्ले देणा-याने आधी स्वतःची लायकी पाहावी अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. स्वतःच्या मुलाशी ज्याचे पटत नाही तो प्रेगनन्ट महिलेची मस्करी करत आहे अशा एक ना अनेक संतप्त प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत.