Join us  

‘रिया चक्रवर्तीची होऊ शकते हत्या...’;  जेडीयू नेत्याने व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 10:22 AM

सुशांत व दिशा प्रकरणात काय आहे कनेक्शन?

ठळक मुद्देरियाने कोर्टात जाऊन आपला जबाब नोंदवला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहेत. मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांसोबत महाराष्ट्र सरकार व बिहार सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. अशात बिहारातील सत्ताधारी जेडीयू पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. काही लोक स्वत:ला वाचवण्यासाठी रिया चक्रवर्तीची हत्या करू शकतात, अशी भीती रंजन यांनी बोलून दाखवली आहे.

सुशांत सिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान यांच्या काहीतरी कनेक्शन असल्याची शक्यता व्यक्त करत राजीव रंजन म्हणाले की, ‘सुशांतच्या मृत्यूआधी त्याची एक्स-मॅनेजर दिशाचा मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी दिशा प्रकरणाची थातूरमातूर चौकशी केली आणि दिशा प्रकरण गुंडाळले. यानंतर सुशांतचा मृत्यू झाला. मात्र हे प्रकरणही योग्यपणे हाताळले जात नसल्याचे दिसतेय. सुशांतच्या मृत्यूला 45 दिवसांचा कालावधी लोटला. पण मुंबई पोलिसांनी बराचसा तपशील गोळा केलेला नाही. आता या प्रकरणात रिया चक्रवर्ती एकमेव साक्षीदार आहे आणि तिच्या जबाबाला महत्त्व आहे. या प्रकरणामागे असलेले लोक कदाचित  रियाची हत्या करू शकतात. त्यामुळे रियाने पोलिस संरक्षण घ्यायला हवे.’

 

रियाने कोर्टात जाऊन आपला जबाब नोंदवला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सुशांत प्रकरणातील सर्व पुरावे द्यावेत आणि या प्रकरणाचा पुढील तपास बिहार पोलिसांनी करावा, अशी मागणीही त्यांनी केली.अभिनेता सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली असून त्यांनी समांतर तपास सुरु केला आहे. मात्र यादरम्यान मुंबई पोलिस बिहार पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप होत आहे. यावरूच या प्रकरणी आता राजकारण तापू लागले आहे.  

टॅग्स :रिया चक्रवर्ती