Join us  

आई रिमा लागू यांच्याइतकीच सुंदर आहे त्यांची लेक, पाहा किती सुंदर दिसते आणि काय करते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:14 AM

Reema Lagoo Birth Anniversary : नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर रिमा लागू यांनी आपल्या मुलीचा एकटीनं सांभाळ केला, आज त्यांची ही मुलगी सिनेक्षेत्रात कार्यरत आहे.

ठळक मुद्देतापसी पन्नूच्या बहुचर्चित ‘थप्पड’ या सिनेमाची कथा मृण्मयी व अनुभव सिन्हा यांनी मिळून लिहिली आहे.

सुमारे तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणा-या दिग्गज अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo ) आज आपल्यात नाहीत. आज त्या आपल्यात असत्या तर वाढदिवस (Reema Lagoo Birth Anniversary) साजरा करत असत्या. 21 जून 1958 रोजी मुंबईत जन्मलेल्या रिमा यांनी ‘सिंहासन’ या मराठी चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात केली होती. 1985 साली ‘खानदान’ या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पुढे श्रीमान-श्रीमती, तू तू मैं मैं या लोकप्रिय मालिकांमध्ये त्या झळकल्या. बॉलिवूडमध्येही अनेक सिनेमांत त्यांनी  त्यांच्या दमदार अभिनयाची छाप सोडली होती.

रिमा यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला होता. रीमा यांचे माहेरचं नाव नयन भडभडे असे होते. त्यांची आई मंदाकिनी भडभडे या देखील एक उत्तम अभिनेत्री होत्या. हिरवा चुडा, हा माझा मार्ग एकला  अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ या नावाने बालकलाकार म्हणून रिमा यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.  महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी नाटकात काम करणे सुरु केले. त्यादरम्यानच्या त्यांनी श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीत काम केले. ही प्रचंड गाजली आणि  यानंतर रिमा यांचा इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा निर्णय पक्का झाला होता. बँकेची नोकरी सोडून त्यांनी अभिनयासाठी वेळ दिला.

 नयन भडभडे रीमा लागू झाल्या...

रिमा यांनी लग्नानंतर विवेक लागू यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. विवेक लागू हे रिमा यांचे बँकेतील सहकारी होते. शिवाय रिमा यांचे रंगभूमी सहकलाकार होते. अर्थात हा विवाह अधिक काळ टिकू शकला नाही. परंतु रिमा यांनी त्यांचे रिमा लागू हेच नाव कायम ठेवले. नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर रिमा यांनी पुन्हा लग्न केले नाही आणि एक सिंगल आई बनून त्यांनी आपल्या मुलीचे पालन पोषण केले.  त्यांनी मुलीला कोणतीही कमतरता जाणवू दिली नाही. एक सिंगल मदर असतानाही त्यांनी मुलीला स्वतःच्या पायावर उभं केले. 

रिमा यांची मुलगीही आहे अभिनेत्री

रिमा लागू यांना एक मुलगी आहे. तिचे नाव मृण्मयी. फार कमी लोकांना ठाऊक आहे की, रिमा यांची मुलगी मृण्मयी एक अभिनेत्री आहे. शिवाय लेखिका, दिग्दर्शिका अशी एक ओळखही तिने निर्माण केली आहे. 2010 साली प्रदर्शित ‘हॅलो जिंदगी’ या हिंदी चित्रपटांत मृण्मयी दिसली होती. ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’ चित्रपटात तिने पुष्कर ओकच्या पत्नीची भूमिका निभावली होती.

इतकेच नाही तर  बायको,  सातच्या आत घरात,  मुक्काम पोस्ट लंडन या  मराठी चित्रपटांत तिने काम केलेले आहे. चित्रपटांत अभिनयाव्यतिरिक्त तिने सेकंड युनिट डायरेक्टर आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून  तलाश, थ्री इडियट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा  सारख्या चित्रपटांसाठी काम केलेले आहे. दंगल,  जेट ट्रॅश, पीके, गुलाब गँग यासारख्या चित्रपटांसाठी स्क्रिप्ट सुपरवाईसर म्हणून काम केलेले आहे. 

तापसी पन्नूच्या बहुचर्चित ‘थप्पड’ या सिनेमाची कथा मृण्मयी व अनुभव सिन्हा यांनी मिळून लिहिली आहे. 2014 साली मृण्मयीने  विनय वायकुळ या असिस्टंट डायरेक्टर सोबत लग्न केले. दोघंही मुंबईत राहतात.  

टॅग्स :रिमा लागू