या कारणामुळे अशोक कुमार यांनी वाढदिवस साजरा करण्याचे दिले होते सोडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 10:47 IST
अशोक कुमार यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. यांच्याप्रमाणे किशोर कुमार आणि अनुप कुमार ...
या कारणामुळे अशोक कुमार यांनी वाढदिवस साजरा करण्याचे दिले होते सोडून
अशोक कुमार यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. यांच्याप्रमाणे किशोर कुमार आणि अनुप कुमार हे त्यांचे भाऊ देखील बॉलिवूडमध्ये नायक होते. किशोर कुमार यांनी तर एक अभिनेते आणि गायक म्हणून स्वतःचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले. किशोर कुमार हे अशोक कुमार यांचे लाडके भाऊ होते. त्यांना त्यांनी लहान भावाप्रमाणे नव्हे तर एखाद्या मुलाप्रमाणे सांभाळले होते. १३ ऑक्टोबरला अशोक कुमार यांचा वाढदिवस असतो. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ला बागलपूरमध्ये झाला होता. १९८७ला अशोक कुमार यांच्याच वाढदिवशी किशोर कुमार यांचे निधन झाले आणि त्यामुळे अशोक कुमार यांनी त्यांचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. अशोक कुमार यांचा इंडस्ट्रीत प्रवेश कसा केला याची एक मजेशीर कथा आहे. अशोक कुमार मुंबईत आल्यानंतर निर्माते दिग्दर्शक हिमांशू राय यांच्याकडे टेक्निशियन विभागात काम करत होते. हिमांशू १९३६ मध्ये त्यांची पत्नी देविका राणीसोबत नैना हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटात हुसैन नावाचा एक अभिनेता होता. पण या अभिनेत्यासोबत देविका राणीचे अफेअर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे या चित्रपटातून हुसैनचा पत्ता कट करण्यात आला आणि या चित्रपटात अशोक कुमारच नायक असणार असे हिमांशू यांनी ठरवले. अशोक कुमार काही केल्या अभिनय क्षेत्रात यायला तयार नव्हते. पण हिमांशू त्यांचे ऐकायला तयारच नव्हते आणि अशाप्रकारे अशोक कुमार यांचा या क्षेत्रात प्रवेश झाला. बंधन, छोटा सी बात, उम्मीद, गृहस्थी, खुबसुरत, शौकिन, कानून, आशीर्वाद यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अशोक कुमार यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत. त्यांनी चित्रपटांप्रमाणेच हम लोग यांसारख्या ऐंशी-नव्वदीच्या अनेक मालिकांमध्ये काम देखील केले होते. आँखो में तुम हो हा अशोक कुमार यांचा सगळ्यात शेवटचा चित्रपट ठरला. त्यांनी चित्रपटांप्रमाणे अनेक बंगाली नाटकांमध्ये देखील अभिनय केला होता. Also Read : अशोक कुमार यांच्या प्रेमप्रकरणांची ‘झुक झुक गाडी’