Join us  

झायरा वसीमच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर भडकली रवीना टंडन, दिली संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 10:14 AM

बॉलिवूडमधून संन्यास घेण्याच्या झायरा वसीमच्या निर्णयावरून लोक दोन गटांत विभागले आहेत. काही लोकांनी झायराच्या या निर्णयाला पाठींबा दिला आहे तर काहींनी यावरून झायरावर आगपाखड केली आहे.

ठळक मुद्देकाल झायराने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहून बॉलिवूडला अलविदा म्हणण्याचा निर्णय जाहिर केला होता.

बॉलिवूडमधून संन्यास घेण्याच्या झायरा वसीमच्या निर्णयावरून लोक दोन गटांत विभागले आहेत. काही लोकांनी झायराच्या या निर्णयाला पाठींबा दिला आहे तर काहींनी यावरून झायरावर आगपाखड केली आहे. बॉलिवूडनेही झायराच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचदरम्यान अभिनेत्री रवीना टंडन हिने झायराच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

झायराला उद्देशून रवीनाने बोचऱ्या शब्दांतील ट्वीट केले आहे. ‘ज्यांनी केवळ दोन चित्रपटांत काम केलेय, असे लोक इंडस्ट्रीबद्दल कृतज्ञतेचे दोन शब्द बोलत नसतील, तर काहीही फरक पडत नाही. अशा लोकांनी शांततापूर्वक इथून निघून जावे आणि उलट्या मार्गाने चालण्याचा आपला विचार स्वत:पर्यंतच मर्यादीत ठेवावा,’ असे तिने लिहिले आहे.बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनीही झायराच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते. धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याचा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे त्यांनी म्हटले.

‘ बॉलिवूडची एक प्रतिभावान अभिनेत्री झायरा वसीम धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडू इच्छिते, हे ऐकून माझ्या अंगावर शहारे आलेत. काय हा नैतिक निर्णय आहे? मुस्लिम समुदायातील अनेक प्रतिभा बुरख्याआड जाण्यास अगतिक आहेत,’असे ट्वीट त्यांनी केले आहे.काल झायराने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहून बॉलिवूडला अलविदा म्हणण्याचा निर्णय जाहिर केला होता.

‘ बॉलिवूडमध्ये माझी प्रगती होत असली, तरी मी खूश नाही. हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते. साहजिकच तिच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘दंगल’ हा झायराचा पहिला सिनेमा होता. २०१६ साली या सिनेमासाठी झायराला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटानंतर पुढच्याच वर्षी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात झायरा झळकली होती. या सिनेमासाठीही तिला फिल्मफेअरचा बेस्ट अ‍ॅक्ट्रेस क्रिटिक्स हा पुरस्कार मिळाला होता. लवकरच झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. झायराने चित्रपट संन्यास घेतल्यामुळे ‘स्काय इज पिंक’ हा तिचा अखेरचा चित्रपट असणार आहे.

 

टॅग्स :झायरा वसीमरवीना टंडन