Join us  

एका रात्रीत नशीब पालटलेल्या रानू मंडलवर आता येणार बायोपिक, ही अभिनेत्री बनणार गायिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:49 AM

रानू मंडलच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता तिच्या आयुष्यावर चित्रपट बनणार आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं गाणं एक प्यार का नगमा हैनं एका रात्रीत रानू मंडलचं आयुष्यच बदलून टाकलं. रानू मंडल सध्याच्या घडीला सोशल मीडियावरील चर्चेचा विषय बनली आहे. रानूचं नाव देशभरात प्रचलित झालं आहे. कोलकाताच्या स्टेशनवर गाणं गाणारी रानूचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. रानूच्या जीवनावर प्रेरीत होऊन ऋषिकेश मंडल तिच्या जीवनावर बायोपिक बनवण्याची योजना आखत आहेत.

रानू मंडलच्या बायोपिकसाठी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्तीला विचारण्यात आलं आहे. ही गोष्ट कन्फर्म करत सुदीप्ता चक्रवर्तीने आयएएनएसला सांगितलं की, हो मला रानू मंडलच्या बायोपिकसाठी विचारण्यात आलं आहे. अद्याप मला स्क्रीप्ट मिळालेली नाही. स्क्रीप्ट वाचल्यानंतर मी ठरवेन की बायोपिकमध्ये काम करायचं की नाही.

पत्रकार ते दिग्दर्शक असा प्रवास करणारे ऋषिकेश मंडल रानू मंडलच्या जीवनावर चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाचं नाव आहे प्लॅटफॉर्म सिंगर रानू मंडल. चित्रपटात रानू मंडलचा रेल्वे स्टेशन ते बॉलिवूड पदार्पणापर्यंतचा प्रवास रेखाटण्यात येणार आहे.

दिग्दर्शक ऋषिकेश मंडलने सांगितलं की, सुदीप्ता चक्रवर्तीला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं आहे. मात्र अद्याप तिने उत्तर दिलेलं नाही. ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकते तर ती सुदीप्ता दी आहे.

ते पुढे म्हणाले की, रानू मंडलच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियाने एका रात्रीत तिला लोकप्रिय बनवलं. लोकांना तिच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचं आहे. चित्रपटात सोशल मीडियाची ताकदही दाखवण्यात येणार आहे.

जर सुदीप्ताने या चित्रपटासाठी होकार दिला तर चित्रपटातील इतर कास्टही फायनल करण्यात येईल. या चित्रपटाच्या शूटिंगला ऑक्टोबरच्या अखेरीस सुरूवात होऊ शकते. या बायोपिकचा काही भाग रानूच्या होमटाऊनमध्ये चित्रीत करण्यात येणार आहे आणि काही मुंबईत शूट होणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती शुभोजित मंडल करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

टॅग्स :राणू मंडलहिमेश रेशमियालता मंगेशकर