सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिकपटांचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेता आमीर खानने महाभारतावर आधारीत चित्रपट रुपेरी पडद्यावर आणणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता दिग्दर्शक कुणाल कोहलीने आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या सिनेमाचे नाव रामयुग असून हा चित्रपट रामायणावर आधारीत असणार आहे.रामायण या महाकाव्यावर आधारित चित्रपट कुणाल कोहली घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘रामयुग’ असणार आहे. कुणाल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. येत्या काही महिन्यात ‘रामयुग’च्या शूटिंगला सुरुवात होईल. २०१९ पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे. कुणालने ट्विट करत त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली.
कुणाल कोहलीने यापूर्वी हलक्या फुलक्या प्रेमकथांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘हम तुम’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यामुळे ‘रामयुग’ साकारताना मोठे आव्हान कुणालसमोर असणार आहे. कुणालसाठी ‘रामयुग’हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात आहेत. रामायण रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी आणि यात कोण कलाकार असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.