राजकुमार यांनी गोविंदाचा शर्ट फाडून केला होता रूमाल; पण त्यांनी असे का केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 16:54 IST
‘जानी हम तुम्हे मारेंगे और जरुर मारेंगे, पर बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वह वक्त ...
राजकुमार यांनी गोविंदाचा शर्ट फाडून केला होता रूमाल; पण त्यांनी असे का केले?
‘जानी हम तुम्हे मारेंगे और जरुर मारेंगे, पर बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वह वक्त भी हमारा होगा’ राजकुमार यांचा ‘सौदागर’मधील हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आपल्या हटके अंदाजासाठी ओळखले जाणारे अभिनेते राजकुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास ५० चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमार हे जेवढे त्यांच्या अभिनयामुळे परिचित असायचे तेवढेच त्यांचे दमदार डायलॉग्सही प्रेक्षकांना भावायचे. ‘सौदागर, तिरंगा, मरते दम तक, बेताज बादशाह, पाकिजा, राजतिलक आणि वक्त’ यांसारख्या चित्रपटांमधील राजकुमार यांचा अभिनय आजही प्रेक्षकांना बघावसा वाटतो. आजही त्यांच्या बोलण्याची स्टाइल प्रेक्षक मिस करतात. एकदा अभिनेता गोविंदाबरोबर असाच एक प्रसंग घडला होता. राजकुमार गोविंदाबरोबर ‘जंगबाज’ची शूटिंग करीत होते. तेव्हा त्यांना गोविंदाने परिधान केलेला शर्ट खूपच आवडला होता. त्यांनी लगेचच गोविंदाच्या शर्टचे कौतुक करण्यास सुरुवात केली. राजकुमार यांनी गोविंदाला म्हटले की, ‘यार तुझा शर्ट खूपच चांगला आहे.’ राजकुमार यांचे हे शब्द ऐकताच गोविंदा जणू काही हरकून गेला. त्याने आनंदाच्या भरात लगेचच राजकुमार यांना अंगातील शर्ट काढून दिला. गोविंदाला असे वाटत होते की, राजकुमार त्याचा शर्ट परिधान करतील. मात्र सगळे उलटेच घडले. दोन दिवसांनंतर जेव्हा गोविंदा राजकुमार यांच्याबरोबर शूटिंगसाठी सेटवर आला तेव्हा त्याला वेगळेच चित्र बघावयास मिळाले. कारण त्याने जे शर्ट राजकुमार यांना घालण्यासाठी दिले होते, त्या शर्टचा राजकुमार यांनी रूमाल केला होता. राजकुमार यांनी चक्क शर्टचा रूमाल करून खिशात ठेवलेला होता. हे बघून गोविंदा दंग राहिला. राजकुमार हे सीनियर अभिनेते असल्याने गोविंदाने त्यांनी असे का केले? हे विचारण्याचे धाडस केले नाही. शिवाय गोविंदालाही राजकुमार यांचा अंदाज माहिती असल्याने त्याने यावर फारशी चर्चा केली नाही. राजकुमार चित्रपटात येण्याअगोदर मुंबईतील एका पोलीस ठाण्यात ठाणेदारची नोकरी करीत होते. एक दिवस दिग्दर्शक बलदेव दुबे यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. ते राजकुमारच्या बोलण्याच्या स्टाइलने एवढे प्रभावित झाले होते की, त्यांनी राजकुमार यांना ब्रेक दिला. त्यांच्यासोबत अनेक चित्रपट करीत बॉलिवूडला एक नवा आणि हटके चेहरा दिला. राजकुमार त्यांच्या हटके स्टाइलसाठी बॉलिवूडमध्ये परिचित झाले होते.