Join us  

“दारू पिणे ही मोठी चूक”, रजनीकांत यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले, “नशेत रात्री दोन वाजता...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 3:35 PM

दारूच्या नशेत रात्री दोन वाजता घरी आलेल्या रजनीकांत यांना भावाने दिलेला सल्ला, म्हणाले...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी असलेल्या रजनीकांत यांनी अभिनयाच्या जोरावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. थलावया अशी ओळख मिळवलेले रजनीकांत ७२व्या वर्षीही कलाविश्वात कार्यरत आहेत. ‘जेलर’ या चित्रपटातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. सध्या ते त्यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या एका कार्यक्रमात त्यांनी दारूच्या व्यसनाबाबत केलेल्या वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘जेलर’ चित्रपटाच्या एका इव्हेंटदरम्यान रजनीकांत यांनी त्यांच्या दारूच्या व्यसनाबाबत उघडपणे भाष्य केलं. “जर माझ्या आयुष्यात दारू नसती, तर मी लोकांची सेवा केली असती. दारू पिणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे,” असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी दोन वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंगही सांगितला. ते म्हणाले, “एका नाटकाच्या प्रयोगानंतर मी दारूच्या नशेत असताना रात्री दोन वाजता घरी आलो होतो. तेव्हा माझ्या भावाने मला सल्ला दिला होता. फक्त आनंद साजरा करण्यासाठी दारूचं सेवन करावं. याचं व्यसन लावून घेऊ नकोस, असं तो मला म्हणाला होता.”

“मी तुम्हाला देव मानतो”, विशाखा सुभेदारला चाहत्याचं पत्र, म्हणाला, “मला हृदयाचा आजार झाला तेव्हा...”

“जर मी दारूच्या आहारी गेलो नसतो, तर आज मी एक मोठा सुपरस्टार असतो. आनंदात असताना, सेलीब्रेशन करताना दारू पिणं वाईट नाही. पण, याचं व्यसन लागणं ही वाईट गोष्ट आहे,” असंही पुढे रजनीकांत म्हणाले. रजनीकांत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

“वडील गेल्यानंतर त्या १३ दिवसांत...”, रवींद्र महाजनींबद्दलच्या चाहत्याच्या प्रश्नाला गश्मीरचं सडेतोड उत्तर

दरम्यान, ‘जेलर’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहे. रजनीकांत यांचा हा चित्रपट नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील कवाला गाण्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :रजनीकांत