Join us  

Birthday Special : - अन् रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले 10 रूपये...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 8:00 AM

आज रजनीकांत यांचा वाढदिवस.

ठळक मुद्दे2007 साली रजनीकांत यांचा ‘शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरडुपर हिट झाला. याचवेळचा हा किस्सा.

साऊथचा ‘देव’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. चार दशकांपेक्षा अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे रजनीकांत म्हणजे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. म्हणूनच आजही त्यांचा चित्रपट येणार म्हटल्यावर चाहते बेभान होतात.

चित्रपटगृहाबाहेर भल्या पहाटे तिकिटासाठी रांगा लागतात. शहरात मोठ मोठे होर्डिंग लागतात. या होर्डिंगला दुधाचा अभिषेक घालण्यापासून तर वाजत गाजत मिरवणुका काढण्यापर्यंत सगळे काही चाहते करतात. आज रजनीकांत यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक थक्क करणारा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

होय, 2007 साली रजनीकांत यांचा ‘शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरडुपर हिट झाला. याचवेळचा हा किस्सा. खुद्द रजनीकांत यांनी एका मुलाखतीत हा किस्सा ऐकवला होता. ‘शिवाजी’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर रजनीकांत यांनी देवदर्शनाची इच्छा व्यक्त केली होती. पण मंदिरात जायचे तर त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न होता. शेवटी यावर तोडगा काढला गेला.

तो म्हणजे, रजनीकांत यांना एका म्हाता-याच्या वेशात मंदिरात पाठवण्याचे ठरले. त्यानुसार, म्हाता-याच्या वेशात रजनीकांत मंदिर परिसरात दाखल झाले. साहजिकच त्या वेशात त्यांना कुणीही ओळखले नाही. रजनीकांत मंदिराच्या पाय-या चढत असताना एक महिलाही त्यांच्यासोबत पाय-या चढत होती. त्या महिलेने रजनीकांत यांना चक्क भिकारी समजून 10 रूपयांची नोट भीकेपोटी दिली.

विशेष म्हणजे, रजनीकांत यांनीही ती नोट स्वीकारली. काही क्षणानंतर रजनीकांत मंदिराच्या गाभा-यात पोहोचले आणि त्यांनी स्वत:जवळचे असतील नसतील तितके पैसे दान केले. योगायोगाने त्याक्षणी ती महिलाही त्यांच्या बाजूला होती. ती स्तब्ध झाली. कारण ही म्हातारी व्यक्ती भिकारी नसून सुपरस्टार रजनीकांत असल्याचे तोपर्यंत तिला कळले होते.  रजनीकांत यांना ओळखताच तिने त्यांची माफी मागितली.

टॅग्स :रजनीकांत