Join us  

राज ठाकरेंनी केलं 'पानिपत'चं कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 2:30 PM

Panipat Movie : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपटाचे कौतुक राज ठाकरे यांनी ट्विटरवर केले आहे.

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित व बहुप्रतिक्षीत चित्रपट 'पानिपत' येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पानिपतची लढाई रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पानिपत या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रशंसा केली आहे आणि हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. 

राज ठाकरे यांनी ट्विट केले की, पानिपतची लढाई ही मराठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपावणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकापार झेंडा नेणारी मराठेशाही कुठे आणि का कमी पडली? त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझा मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानी यांनी देखील पहायला हवा.

 

यापूर्वी राज ठाकरे यांनी ‘पानिपत’च्या ट्रेलनंतरही त्याचे कौतूक केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या लढाईवरील ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री आहे.

 

चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे.

तर क्रिती सॅनन हिने पार्वतीबाईंची भूमिका साकारली आहे. यासोबतच पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तीन वर्षांनंतर कमबॅक करत आहेत. 2016 मध्ये गोवारीकर यांचा ‘मोहेंजोदारो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली होती. या चित्रपटानंतर गोवारीकर ‘पानिपत’ घेऊन येत आहेत. साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अजय-अतुलने संगीतबद्ध केलेला हा चित्रपट येत्या ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :राज ठाकरेपानिपतआशुतोष गोवारिकर