Join us  

तर मी सुद्धा बुरखा घातला असता...! बुरखा प्रकरणावर ए. आर. रहमानचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 1:42 PM

सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान याची मुलगी खतीजा हिच्या बुरख्याचा वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत.

सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान याची मुलगी खतीजा हिच्या बुरख्याचा वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. होय, अनेक इव्हेंटमध्ये खतीजा बुरख्यात पाहून अलीकडे बांगलादेशी लेखिका तस्मिला नसरीन यांनी एक ट्वीट केले होते. ‘खतीजाला बुरख्यात पाहिल्यावर माझा जीव घुसमटतो,’ असे तस्लिमा म्हणाल्या होत्या. तस्लिमांच्या या ट्वीटवर खतीजाने खरमरीत उत्तर दिले होते. ‘मला बुरख्यात पाहून तुम्हाला घुसमटल्यासारखे वाटत असेल तर कृपया तुम्ही शुद्ध हवेत जा, मोकळा श्वास घ्या. दुस-या महिलांना कमी लेखणे हा स्त्रीवादाचा अर्थ नाही,’ असे खतीजाने तस्लिमांना उद्देशून लिहिले होते. आता ए. आर. रहमान यानेही या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे.

होय, एका ताज्या मुलाखतीत रहमानने लेकीच्या बुरख्यावर प्रतिक्रिया दिली. ‘बुरखा घालणे हा खतीजाचा स्वत:चा निर्णय आहे. तिने हा निर्णय घेण्याआधी आम्हा कुणालाही विचारले नव्हते,’ असे रहमान म्हणाला. केवळ इतकेच नाही तर, मला संधी मिळाली तर मलाही बुरखा घालायला आवडेल, असेही तो म्हणाला. ‘पुरूषाकडून बुरखा घालण्याची अपेक्षा केली जात नाही. नाही तर मी सुद्धा बुरखा घातला असतात. यामुळे मी कुठल्याही दुकानात जाऊन मी अगदी मजेत शॉपिंग करू शकलो असतो. कदाचित खतीजाही हेच स्वातंत्र्य प्रिय असावे,’ असे रहमान म्हणाला.

काय म्हणाली होती खतीजा?तस्लिमा यांच्या ट्वीटला उद्देशून खतीजाने लिहिले होते, ‘माझ्या कपड्यांना बघून तुमचा श्वास घुसमटतो, याबद्दल सर्वप्रथम माफी मागते. तुम्ही प्लीज, बाहेर पडून मोकळी हवा खा. कारण या कपड्यांमध्ये माझा श्वास कधीच घुसमटत नाही. उलट या कपड्यांचा मला अभिमान वाटतो. प्लीज, तुम्ही गुगलवर फेमिनिज्मचा अर्थ जरूर शोधा. कारण दुस-या महिलांना तुच्छ लेखणे आणि कुण्या महिलेच्या वडिलांना अशा मुद्यामध्ये गोवणे हे फेमिनिज्म नाहीच.   माझ्या फोटोवर तुम्ही बोलावे, यासाठी मी माझा फोटो तुमच्याकडे कधी पाठवला होता, हे मला आठवत नाही.’

टॅग्स :ए. आर. रहमान