Join us  

भारतातील पाकिस्तानी सिनेप्रेमींचे आवडते सिनेमागृह अखेर बंद, म्हणून मालकाने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 8:00 PM

पंजाबमधील सर्वात जुन्या सिनेमागृहांपैकी एक असलेले आणि कधीकाळी पाकिस्तानी सिनेप्रेमींचे आवडते राहिलेले राजा टॉकीज हे सिनेमागृह बंद झाले आहे.

ठळक मुद्देखरेदीसाठी आणि व्यापारासाठी भारतात आले की, पाकिस्तानी नागरिक या टॉकीजला हमखास भेट देत.

पंजाबमधील सर्वात जुन्या सिनेमागृहांपैकी एक असलेले आणि कधीकाळी पाकिस्तानी सिनेप्रेमींचे आवडते राहिलेले राजा टॉकीज हे सिनेमागृह बंद झाले आहे. होय,  या टॉकीजच्या मालकांनी ही हेरिटेज प्रॉपर्टी विकण्याचा निर्णय घेतला आहे.राजा टॉकीजच्या नावाने प्रसिद्ध असलेले धनी राम थिएटर हे पंजाबमध्ये आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरीज फिरोजपूर शहरात १९३० मध्ये हे सिनेमागृह उभारण्यात आले आणि बघता बघता लोकप्रिय झाले. पण काळासोबत या सिनेमागृहाला उतरती कळा लागली आणि मालकांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला.

वाढता टॅक्स आणि मल्टिप्लेक्स संस्कृती यामुळे या सिनेमागृहात येणा-या सिनेप्रेमींची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. याऊलट देखभालीचा खर्च मात्र वाढत गेला. परिणामी मालकांनी हे सिनेमागृह विक्रीला काढले.  राजा टॉकीजच्या मालकांपैकी एक असलेले सुभाष कालिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘शहरातील बहुतांश सिनेमागृहांची जागा मल्टिप्लेक्सने घेतली आहे. भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवर असलेले हे सिनेमागृह  आता फार काळ तग धरू शकणार नाही आणि म्हणून आम्ही राजा टॉकीज बंद करण्याचा निर्णय घेतला’,असे त्यांनी सांगितले.

एकेकाळी पाकिस्तानी सिनेमाप्रेमी या टॉकीजमध्ये येऊन सिनेमा पाहत.  खरेदीसाठी आणि व्यापारासाठी भारतात आले की, पाकिस्तानी नागरिक या टॉकीजला हमखास भेट देत. नरगिस, शम्मी कपूर, दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर यांचे सिनेमा पाहत. त्याकाळात पाकिस्तानसोबत हुसैनीवाला चेक पोस्ट मार्फत व्यापार होत असे. पण १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धानंतर हा चेक पोस्ट व्यापारासाठी बंद करण्यात आला आणि पाकिस्तानी सिनेप्रेमींचे येणे बंद झाले. दर रविवारी याठिकाणी इंग्रजी सिनेमा लागत असे. सैन्य दलाचे अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय हे सिनेमे पाहिण्यासाठी येत. पाकिस्तानी ड्रामा, सीरिअल सुद्धा याठिकाणी दाखवल्या जात.

टॅग्स :पाकिस्तान