Join us  

​अभिनेता डॅनी डेन्जोंग्पावर वाहतूक विभागाची कार्यवाही; भरावा लागला २९ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 3:09 PM

बॉलिवूड अभिनेता डॅनी डेन्जोंग्पा याने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी २९ लाख रुपये दंड भरल्याचे सांगण्यात येते. सिक्किम राज्यात नोंदणी ...

बॉलिवूड अभिनेता डॅनी डेन्जोंग्पा याने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी २९ लाख रुपये दंड भरल्याचे सांगण्यात येते. सिक्किम राज्यात नोंदणी करण्यात आलेली गाडी डॅनी मुंबईत वापरत होता मात्र पथकर न चुकविल्यामुळे त्याच्यावर ही कार्यवाही करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. एखाद्या अभिनेत्याला वाहतूक कायद्याअंतर्गत एवढी मोठी रक्कम भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता डॅनी डेन्जोंग्पा याची सिक्कीम राज्यातील नोंदणी असलेली रेंज रोव्हर कार तो मुंबईमध्ये वापरत होता. या कारची पासिंग सिक्कीम राज्याची असल्याने १३ फेब्रुवारीला डॅनीची गाडी वाहतूक पोलिसांनी अडविली होती. परराज्यातील नंबर प्लेट असल्यामुळे त्याच्याकडे वाहतूक पोलिसांनी गाडीच्या आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र, पथकरा भरल्यासंदर्भातील कागदपत्राची डॅनी पूर्तता करू शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी गाडी जप्त केली होती. बुधवारी त्यांच्या ड्रायव्हरने २९ लाख रुपये दंडाची रक्कम भरुन गाडी वाहतूक पोलिसांच्या ताब्यातून सोडवून नेली.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी पथकर न भरणाºया गाड्यांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांव्यतिरिक्त 450 गाड्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या या बेधडक कारवाईमध्ये सात अभिनेत्री, दोन संगीतकार आणि नऊ गायकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची नावे अद्याप उघड होऊ शकलेली नाही. अनेक प्रादेशिक कलावंत आपल्या राज्यातून महागड्या कार्स विकत घेतात व मुंबईत वापरतात. मुंबईत गाडी वापरण्यासाठी राज्य वाहतूक विभागाची परवाणगी आवश्यक असते.