Join us  

प्रकाश राजने गरिबांसाठी केलेले हे काम वाचून तुम्हाला नक्कीच वाटेल त्याच्याविषयी अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 3:02 PM

प्रकाश राजने समाजासाठी अतिशय चांगले आणखी एक काम केले आहे.

ठळक मुद्देप्रकाश राजने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे आणि त्याद्वारे सांगितले आहे की, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी चेन्नईमधील पाँडेचरी येथील ११ रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची माझ्या फार्म हाऊसमध्ये राहाण्याची व्यवस्था केली आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. अनेक जण पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत. अभिनेता प्रकाश राजने काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना मे महिन्यापर्यंतचा पगार दिला होता. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या संपूर्ण स्टाफला सुट्टी देखील दिली आहे आणि आता प्रकाश राजने समाजासाठी अतिशय चांगले आणखी एक काम केले आहे.

देशभरात लॉकडाऊन असल्याने रोजंदारीवर काम करत असलेल्या लोकांचे खाण्याचे हाल होत आहेत. एवढेच नव्हे तर अनेकांकडे घरे नसल्याने आता कुठे राहायचे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशा गरीब लोकांसाठी प्रकाश राज मदतीला धावून आला आहे. प्रकाश राजचा आज वाढदिवस असून त्याने वाढदिवसाच्या दिवशी एक मोठी घोषणा केली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना त्याने आपल्या फार्म हाऊसमध्ये राहाण्याची परवानगी दिली आहे. त्यानेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितली आहे. 

प्रकाश राजने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे आणि त्याद्वारे सांगितले आहे की, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी चेन्नईमधील पाँडेचरी येथील ११ रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची माझ्या फार्म हाऊसमध्ये राहाण्याची व्यवस्था केली आहे. ही केवळ सरकारची नव्हे तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. सगळ्यांनी मिळून माणुसकी दाखवूया..

प्रकाश राजने त्याच्या ट्विटरवर काही दिवसांपूर्वी पोस्ट लिहिली होती... त्याद्वारे त्याने सांगितले होते की, जनता कर्फ्यू असल्याने माझ्या घरात काम करणारी मंडळी, फिल्म प्रॉडक्शनमधील लोक, माझ्या काही संस्था आणि इतर स्टाफच्या सर्वांना मी मे महिन्यापर्यंतची सॅलरी अगोदरच देऊन टाकली आहे. तसेच मी माझ्या आगामी तीन चित्रपटात रोजच्या वेतनावर काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना निम्म्याहून जास्त वेतन दिलं आहे. पुढेही त्यांच्यासाठी काही ना काही मी करत राहणारच आहे. तुम्ही देखील अशा गरजू लोकांना तुम्हाला जमेल तशी मदत करा... आज सगळ्यांनी एकमेकांना मदत करण्याची गरज आहे.

टॅग्स :प्रकाश राजकोरोना वायरस बातम्या