Join us  

प्रकाश राज म्हणतोय माणुसकी जपूया, दररोज करतोय ५०० मजुरांची जेवणाची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 3:44 PM

आपले घर गाठण्यासाठी पायी चालणाऱ्या मजुरांसाठी प्रकाश राज दररोज जेवणाची व्यवस्था करत आहे.

ठळक मुद्देप्रकाश राजने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, आापल्या घरी पोहोचण्यासाठी अनेकजण सध्या रस्त्याने चालत आहेत. हायवे वरून चालत असलेल्या लोकांची माझ्या फाऊंडेशनतर्फे दररोज जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत.

या संकटामध्ये अभिनेता प्रकाश राज अनेकांना मदत करत आहे. त्याने ३१ मजदूरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी नुकतीच मदत केली होती आणि आता त्याच्या फार्म हाऊसवर ५०० हून अधिक मजुरांची जेवणाची व्यवस्था दररोज केली जात आहे. सध्या विविध राज्यात असलेले मजूर आपल्या घरी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातील अनेक मजूर घरी पोहोचण्यासाठी पायी जाण्याचा पर्याय निवडत आहेत. त्यातीलच पायी जाणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी प्रकाश राज सरसावला असून तो पायी जाणाऱ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत आहे. त्यानेच सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

प्रकाश राजने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, आापल्या घरी पोहोचण्यासाठी अनेकजण सध्या रस्त्याने चालत आहेत. हायवे वरून चालत असलेल्या लोकांची माझ्या फाऊंडेशनतर्फे दररोज जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. ५०० हून अधिक मजुरांसाठी माझ्या फार्म हाऊसवर दररोज जेवणाची व्यवस्था करण्यात येत असून या मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यास मदत करूया... त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊया... आणि माणुसकी जपूया...

प्रकाश राजने काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना मे महिन्यापर्यंतचा पगार दिला होता. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या संपूर्ण स्टाफला सुट्टी देखील दिली होती. त्यानंतर रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना त्याने आपल्या फार्म हाऊसमध्ये राहाण्याची परवानगी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश राज समाजोपयोगी अनेक कामं करत आहे. प्रकाश राज अनेक लोकांची दररोज जेवण्याची व्यवस्था करत असून अनेकांना त्याने धान्यं दिली आहेत.

टॅग्स :प्रकाश राजकोरोना वायरस बातम्या