Join us

"चिठ्ठी आयी है" गाण्यामागची गोष्ट! पंकज उधास यांनी सांगितलेला किस्सा माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 5:21 PM

पंकज उधास यांचं आज निधन झालं. त्यानिमित्ताने वाचा त्यांच्या गाजलेल्या 'चिठ्ठी आयी है' गाण्यामागचा खास किस्सा (Pankaj Udhas)

पंकज उधास यांचं आज ७२ व्या वर्षी निधन झालं. पंकज यांच्या अकस्मात निधनाने संगीतविश्वावर आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. पंकज यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली. पण ज्या गाण्याने त्यांना ओळख मिळाली ते म्हणजे 'चिठ्ठी आयी है'. या गाण्यामागचा खास किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे गाणं गायला पंकज उधास यांनी सुरुवातीला नकार दिलेला. नंतर काय घडलं?

पंकज यांनी LEHREN.COM ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. पंकज म्हणाले, "या गाण्यामागे एक रंजक कथा आहे. खरे तर हे गाणे मला कधीच गायचे नव्हते. जेव्हा हा चित्रपट बनत होता, तेव्हा या विशिष्ट गाण्यासाठी माझा विचार करण्यात आला होता. सलीम खान साहेबांनी कथा लिहिली होती. महेश भट्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. राजेंद्र कुमार हे निर्माते होते. हे गाणे अभिनेत्याने नव्हे तर वास्तविक जीवनातील गायकाने गायले पाहिजे, असे सर्वांना वाटत होतं. चित्रपटाची परिस्थिती अशी आहे की एक लाईव्ह कॉन्सर्ट आहे आणि एक गायक गाणे म्हणत आहे. त्यामुळे त्यांना खऱ्या आयुष्यातील गायक हवा होता, जो जनमानसात प्रसिद्ध असेल."

पंकज पुढे म्हणाले, "त्यामुळे जेव्हा निर्मात्याने मला हे गाणे करायला सांगितले तेव्हा ते म्हणाले, ‘पंकज, तू आमच्या चित्रपटात दिसायला हवं.’ आणि मी घाबरलो. त्यांनी मला सांगितले की या चित्रपटात त्यांचा मुलगा कुमार गौरव आणि संजय दत्त यांची भूमिका आहे. त्यामुळे या दोघांसोबत मलाही या चित्रपटात अभिनय करावा लागेल, असं माझ्या मनात आलं.”

पंकज पुढे म्हणाले, “मी घाबरलो कारण मला कधीच अभिनेता व्हायचे नव्हते. माझे लक्ष नेहमीच गाणं आणि संगीतावर राहिले आहे. मी राजेंद्र कुमारजींना सांगितले की, मी तुम्हाला याविषयी कळवेन. पण, मी त्यांना परत फोन केला नाही. त्यामुळे राजेंद्रजींनी माझा मोठा भाऊ मनोजला फोन करुन माझी तक्रार केली. पुढे मी राजेंद्रजींना फोन करुन मी चित्रपटात काम करणार नाही, म्हणत त्यांची माफी मागितली. ते म्हणाले, ‘तुला चित्रपटात काम करण्यास कोणी सांगितले? तू पंकज उधासच्याच भूमिकेत या चित्रपटात दिसावे अशी माझी इच्छा आहे."

शेवटी पंकज यांनी हे गाणं गाण्यासाठी होकार दिला. पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहितच आहे. बीबीसी रेडिओने जगभरातील  १०० गाण्यांपैकी एक म्हणून ‘चिठ्ठी आयी है’ची निवड केली. आज पंकज उधास यांचं निधन झालं तरीही त्यांनी गायलेली अशीच गाणी सदैव रसिकांच्या स्मरणात असतील.

टॅग्स :बॉलिवूड