Join us  

पाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघातात प्रसिद्ध मॉडेलचे निधन, फॅन्सना बसलाय धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 11:02 AM

या मॉडेलच्या निधनाची बातमी पसरताच तिचे फॅन्स तिला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत.

ठळक मुद्देया अपघातात पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा आबिद हिचा मृत्यू झाला असून यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. झारा आबिदच्या काकांचे निधन झाल्याची बातमी तिला नुकतीच कळाली होती. त्यामुळे ती त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाहोरहून कराचीला चालली होती.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला शुक्रवारी भीषण अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणारं हे विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. यामध्ये तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण यातून वाचले आहेत. या अपघातात एका मॉडेलला देखील आपला जीव गमवावा लागला आहे.

या अपघातात पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा आबिद हिचा मृत्यू झाला असून यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. झारा आबिदच्या काकांचे निधन झाल्याची बातमी तिला नुकतीच कळाली होती. त्यामुळे ती त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाहोरहून कराचीला चालली होती अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आह. तिच्या निधनाची बातमी कळताच तिचे फॅन्स सोशल मीडियाद्वारे तिला श्रद्धांजली वाहत आहेत. पाकिस्तान चित्रपटसृष्टीतील अनेकजण देखील सोशल मीडियाद्वारे झाराच्या आठवणींना उजाळा देत आहेत. पाकिस्तानमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर खादिजाह शाहने ट्विटरद्वारे झाराला श्रद्धांजली वाहिली आहे. तिने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, फॅशन जगताने आज झालेल्या विमान अपघातात झारा आबिदला गमावलं. ती अतिशय कष्टाळू आणि व्यावसायिक होती. तिच्या आत्म्याला शांती लाभो.

झारा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय होती. आता तिच्या निधनानंतर तिची इन्स्टाग्रामवरील शेवटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात ती हेलिकॉप्टरमध्ये बसलेली दिसत असून "Fly high, it’s good' असे तिने कॅप्शन दिले आहे. सध्या तिच्या या पोस्टचीच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

पीआयएचे हे विमान कॅप्टन सज्जाद गुल उडवत होते. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरण्याच्या बरोबर 10 मिनिटे आधी, विमानात तांत्रिक समस्या असल्याचे पायलटने सांगितले होते. यादरम्यान, एअर ट्राफिक कंट्रोल आणि पायलट यांच्यातील अखेरच्या संभाषणाचं रेकॉर्डिंगदेखील समोर आलं आहे. एअरबस ए320च्या पायलटचे रेकॉर्ड झालेले अखेरचे शब्द "विमानाचे इंजिन काम करत नाही," असे होते. त्यानंतर या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. विमान रनवेपासून फक्त एक किलोमीटर दूर असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :पाकिस्तान