Join us

PADMAVATI ASSAULT: संजय लीला भंसाळीच्या पाठीशी उभे राहिले बॉलीवूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 11:12 IST

जयपूर येथे ‘पद्मावती’ चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांना करणी सेनेच्या कार्यक र्त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेचा बॉलीवूड सेलिब्रेटींनी निषेध केला आहे. राणी पद्मावती यांचे अपमानास्पद चित्रण या सिनेमात दाखवण्यात येत असल्याचा आक्षेप ‘करणी सेना’ या संघटनेने घेतला आहे.

दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्यावर ‘पद्मावती’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान ‘कथित संस्कृती रक्षकांकडून’ करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याविरुद्ध संपूर्ण चित्रपटसृष्टीतून रोष व्यक्त होत आहे. राणी पद्मावती यांचे अपमानास्पद चित्रण दाखवण्यात येत असल्याचा आक्षेप घेत ‘करणी सेना’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जयपूर येथील सेटवर तोडफड करत भंसाळी यांना मारहाण केली.अशाप्रकारे एखाद्या कलाकाराला करण्यात आलेल्या मारहाणीतून आपल्या देशातील प्रतिगामीशक्तींचा उन्माद किती वाढला आहे हे दिसतेय, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया बॉलीवूडमध्ये उमटत आहे. अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर आपापले संदेश, ट्विट लिहून भंसाळी यांना ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हा विश्वास दिला.भंसाळींसोबत काम केलेल्या हृतिक रोशनने लिहिले की, ’भंसाळीजी, मी तुमच्यासोबत आहे. हे जे काही झाले आहे ते अतिशय दु:खद आणि चीड आणणारे आहे.’ दिग्दर्शक करण जोहरने दोन ट्विट करून आपल्या विरोध दर्शवला. ‘भंसाळींसोबत जे घडले ते अत्यंत निंदणीय आहे. स्वानुभवामुळे त्यांना काय वाटत असेल हे मी चांगले समजू शकतो. आता हीच खरी वेळ आहे संपूर्ण इंडस्ट्रीने एकत्र येण्याची.’ अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा खंदा पुरस्कर्ता अनुराग कश्यपने ट्विट केले की, ‘आता तरी सगळी चित्रपटसृष्टी एकवटून अशा उपद्रवीशक्तींचा एकजुटीने सामना करण्यासाठी सज्ज होणार का’ बिपाशा बसूने या हल्लाखारोंना शिक्षा करण्याची मागणी केली तर अनुष्का शर्माने म्हणाली की, अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यासाठी कोणतेच कारण योग्य असू शकत नाही. ‘जर तुम्हाला तो चित्रपट आवडत नसेल तर तुम्ही पाहू नका. हिंसा करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता? उगीच संस्कृतीचे रक्षक म्हणून स्वत:ला मिरवू नका. मी तर वाट पाहतोय किती जणांना यासाठी शिक्षा होते. कारण व्हिडिओमध्ये सगळे पुरावे आहेत’, अशा शब्दांत फरहान अख्तरने आपल्या भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री स्वरा भास्करने या घटनेची निंदा करत सवाल केला की, ‘भंसाळीसारख्या दिग्दर्शकाला मारहाण करणाऱ्यांनो, हाच काय तुमचा सहिष्णू भारत?’ हुमा कु रेशीने ट्विट केले की, अशा गुंडांना कोणी आपल्या देशाच्या संस्कृतीचे रक्षक म्हणून ठेका दिला? काय आहे संपूर्ण घटना?जयपूरच्या गयगड किल्ल्यावर ‘पद्मावती’ची शूटींग सुरू असताना अत्यंत अर्वाच्य शब्दांत घोषणा देत जमाव सेटवर आला आणि सामानाची तोडफोड केली. यावेळी भंसाळी व त्यांचे सहकाऱ्यांनी जमावाला शांत राहण्याची विनंती केली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.गर्दीतून कोणी तर भंसाळींना चापट मारली आणि परिस्थिती आणखी चिघळली. क्रु मेंबर्सने भंसाळींभोवती सुरक्षाचक्र बनवून त्यांना सुरक्षित स्थळी नेले. पण जमावाचा गोंधळ एवढ्यावर थांबला नाही. त्यांनी शिव्या देत सेटवरील सामान जमीनीवर फेकून, काठ्या मारून प्रचंड नुकसान केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार उपस्थित होते की नाही याबाबत अद्याप माहिती नाही. करणी सेनेचा कार्यकर्ता विक्रम सिंग म्हणाला की, आमचा विरोध चित्रपटात राणी पद्मावती यांचे चुकीचे चित्रण दाखवण्याला आहे. सिनेमात इतिहासाशी विसंगत असे संदर्भ दाखवण्यात येत आहेत आणि ते आम्ही सहन करणार नाही.’ अद्याप कोणाविरु द्धच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.                                           चित्रपटात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दिन खिलजी यांचे प्रणय प्रसंग चित्रित केले जाणार असल्याच्या वृत्ताने हा विरोध सुरू झाला. या भागातील लोकप्रिय धारणेनुसार, पद्मावतीने खिलजीच्या दबावाला बळी न पडता स्वत:च्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध नव्हतेच.सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण राणी पद्मावतींच्या मुख्य भूमिकेत आहे तर शाहीद कपूर तिचा पती रावल रतन सिंग तर रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिलजी साकारत आहे.