Join us  

Operation Romeo Movie Review : काय घडलं त्या रात्री?, कसा आहे शरद केळकरचा 'ऑपरेशन रोमियो' सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 4:50 PM

Operation Romeo Movie Review : २०१९मध्ये मल्याळम भाषेत रिलीज झालेल्या 'इश्क नॅाट अ लव्ह स्टोरी' या चित्रपटाचा 'ऑपरेशन रोमियो' हा हिंदी रिमेक आहे.

कलाकार : सिद्धांत गुप्ता, वेदिका पिंटो, शरद केळकर, किशोर कदम, भूमिका चावलादिग्दर्शक - शशांत शाहकालावधी : २ तास १५ मिनिटेदर्जा : दोन स्टार चित्रपट परीक्षण: संजय घावरे 

'जागरुक व्हा, सतर्क रहा' असं आपल्याला पदोपदी सांगितलं जातं, पण एखाद्या अवघड परिस्थितीत किंवा संकटात सापडल्यावर या सर्वांचा विचार करायलाही कोणाकडे वेळ नसतो. खरं तर हिच खरी सावध राहण्याची वेळ असते. समोर दिसतं त्यावर आपण विश्वास ठेवतो. त्याला घाबरतो आणि त्यामुळेच बऱ्याचदा फसवलेही जातो. 'ऑपरेशन रोमियो' या चित्रपटातही अशाच एका नायक-नायकाची कथा आहे. या थ्रिलरपटाचं दिग्दर्शन करताना शशांत शाह यांनी बऱ्याच चुका केल्या आहेत. त्यामुळं विषय चांगला असला तरी तो प्रभावीपणे पडद्यावर मांडल्याचं जाणवत नाही. यात केवळ एक जमेची बाजू म्हणजे 'काय घडलं त्या रात्री?' या प्रश्नाचं रहस्य अखेरपर्यंत कायम राखण्यात आलं आहे.

आयटीमध्ये काम करणारा आदित्य आणि शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहणाऱ्या नेहाची ही कहाणी आहे. नेहाच्या वाढदिवशी आदित्य आपल्या कारमधून तिला फिरायला नेतो. नाईट आऊट करून सकाळी सन राईझिंगचं मनोहारी दृश्य पाहून आनंदी चेहऱ्यानं नेहाला हॉस्टेलवर सोडण्याचा आदित्यचा प्लान असतो. दोन प्रेमी जीव एकत्र आल्यावर रात्रीच्या काळोखात कारमध्ये आपोआप एकमेकांच्या जवळ येतात आणि तोच काचेवर एक थाप पडते. मंगेश कदम नावाचा पोलीस अधिकारी पाटीलभाऊ या आपल्या जोडीदारासह तिथे येऊन धडकतो. दोघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यासाठी व्हॅन बोलवतो. पोलीस ठाण्यात नेल्यावर आपली बेअब्रू होईल. घरी समजेल या भीतीनं आदित्य दोघांना पैसे देऊ करतो. त्यानंतर काय होतं ते चित्रपटात आहे.

आजवर एका पेक्षा एक सरस चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक नीरज पांडेंची निर्मिती असलेल्या या चित्रपटात त्यांच्या दिग्दर्शन शैलीचा लवलेषही कुठे दिसत नाही. २०१९मध्ये मल्याळम भाषेत रिलीज झालेल्या 'इश्क नॅाट अ लव्ह स्टोरी' या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. पटकथेची मांडणीच चुकल्यानं सुमार दर्जाचा चित्रपट पहायला मिळतो. ढिसाळ पटकथा आणि तितक्याच निष्काळजीपणे केलेलं दिग्दर्शन या दोन गोष्टी या चित्रपटाला मारक ठरल्या आहेत. पदार्पणातच दिग्दर्शक फेल झाले आहेत. पटकथेपासून सादरीकरणापर्यंत सर्वच बाबतीत गडबड झाली आहे. सुरुवातीपासून कथानक फार मंद गतीनं पुढे सरकतं. पूर्वार्ध खूपच स्लो आणि कंटाळवाणा वाटतो. या तुलनेत उत्तरार्ध उत्सुकता वाढवणारा आहे. पटकथेची मांडणी नॅान-लिनियर पद्धतीनं केली गेली असतील तर कदाचित वेगळा प्रभाव पडू शकला असता. 'काय घडलं त्या रात्री?' केवळ या प्रश्नाच्या उत्तरासाठी चित्रपट अखेरपर्यत पहावा लागतो. सर्वसामान्य माणूस पोलीस म्हटलं की विनाकारण घाबरतो. याचाच फायदा काही जण घेतात. या चित्रपटातही तेच पहायला मिळतं. रहस्य आणि रोमांच यातील ताळमेळ साधण्यात दिग्दर्शक अपयशी ठरले आहेत. गीत-संगीत आणि इतर तांत्रिक गोष्टीही फारशा प्रभावी नाहीत. आजच्या समानतेच्या युगात स्त्री आणि पुरुष दोघांनीही आपल्या जोडीदाराच्या भावभावनांचा योग्य आदर ठेवणं गरजेचं असल्याचं सांगत शेवट अपेक्षेपेक्षा खूपच वेगळा केला गेला आहे.

छोट्या पडद्याच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेला सिद्धांत गुप्ता आाणि म्युझिक व्हिडीओद्वारे संगीतप्रेमींचं लक्ष वेधून घेतलेली वेदिका पिंटो यांच्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. सिद्धांतनं आपली व्यक्तिरेखा काहीशा नावीन्यपूर्ण पद्धतीनं साकारल्याचा प्रयत्न केला आहे. वेदिकाच्या वाट्याला फार काम नव्हतं, पण जे होतं ते तिनं चांगलं केलं आहे. शरद केळकरनं बाजी मारली आहे. त्यानं साकारलेला मंगेश कदम डॅशिंग वाटतो. त्याला किशोर कदम यांची चांगली साथ लाभली आहे. भूमिका चावलाचं कॅरेक्टर आश्चर्याचा धक्का देणारं असून, तिनं ते उत्तमरीत्या सादर केलं आहे. थोडक्यात काय तर खिशातले पैसे खर्च करून थिएटरमध्ये जाऊन पाहण्याजोगा हा चित्रपट नक्कीच नाही. काही दिवसांनी ओटीटीवर दिसेलच.

टॅग्स :शरद केळकरकिशोर कदम