Join us  

बापरे! सोनू सूदच्या नावाने होतेय फसवणूक, खुद्द त्यानेच केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 10:04 AM

सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन काही अशा लोकांचे मेसेज स्क्रीनशॉट केले आहेत. ज्यामध्ये सोनू सूदच्या नावाखाली मजुरांना लुटले जात आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. यादरम्यान या अडकलेल्या मजुरांसाठी देवासारखा धावून आला तो म्हणजे बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद. तो करत असलेल्या मदतकार्यामुळे चांगलाच चर्चेत आलाय. स्थलांतरितांची तो जी मदत करत आहे. त्यामुळे तो आता त्यांचा ‘रिअल हिरो’ बनलाय. त्याने अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवले आहे. सोनू सूदच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. सोनू सूदच्या नावाने फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आणि याचा खुलासा स्वत: सोनू सूदने ट्विटरद्वारे केला आहे.सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन काही अशा लोकांचे मेसेज स्क्रीनशॉट केले आहेत. ज्यामध्ये सोनू सूदच्या नावाखाली मजुरांना लुटले जात आहे. मजूरांना त्यांच्या घरी सोडण्याच्या बहाण्याने पैसे वसूल करत आहेत. या फ्रॉड लोकांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट आपल्या ट्विटरवर शेअर करत सोनूने सर्वांना सावध केले आहे. त्याने अशा लोकांच्या बोलण्यात न अडकण्याचे आवाहन करत आपण देत असलेली सुविधा ही पूर्णपणे निशुल्क असल्याचे सुद्धा सांगितले आहे.

सोनू सूदने ट्विटच्या माध्यमातून लोकांना आवाहन केले की, 'मित्रांनो काही लोक तुमच्या गरजेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते तुमच्याशी त्यासाठी संपर्क करतील. जी सेवा मी मजूरांना देत आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नाही.

जर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे माझ्या नावाने पैसे मागत असेल तर त्याला पैसे देऊ नका. लगेच आम्हाला कळवा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा'.

टॅग्स :सोनू सूद