OMG : ‘भूमी’च्या सेटला भीषण आग; आदिती राव हैदरी थोडक्यात बचावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 20:52 IST
शनिवारचा दिवस बॉलिवूड जगताला हादरवणारा ठरला. कारण शनिवारी अशी काही घटना घडली, ज्यामुळे प्रत्येकाचाच श्वास रोखला गेला. मात्र सुदैवाने ...
OMG : ‘भूमी’च्या सेटला भीषण आग; आदिती राव हैदरी थोडक्यात बचावली!
शनिवारचा दिवस बॉलिवूड जगताला हादरवणारा ठरला. कारण शनिवारी अशी काही घटना घडली, ज्यामुळे प्रत्येकाचाच श्वास रोखला गेला. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने अनेकांच्या जिवात जीव आला. होय, आम्ही ‘भूमी’ या चित्रपटाच्या सेटला लागलेल्या भीषण आगीविषयी बोलत आहोत. त्याचे झाले असे की, चित्रपटातील एक सिक्वेंस शूट करायचा होता. मात्र अचानकच सेटला आग लागल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली. बघता बघता आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने अभिनेत्री आदिती राव हैदरी ही आगीच्या विळख्यात सापडली. मात्र सुदैवाने तिला सेटवरून सुखरूप बाहेर काढण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून आदिती थोडक्यात बचावली. जेव्हा ही बातमी इंडस्ट्रीत पसरली तेव्हा अनेकांनी ईश्वरांचे आभार मानले. चित्रपटातील अभिनेता सिद्धांत गुप्ताने सांगितले की, आम्ही कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासोबत एक वेडिंग सॉँगची शूटिंग करत होतो. तेव्हाच शॉट सर्किटमुळे सेटवर आग लागली. त्यावेळी शेटवर जवळपास ३०० लोक उपस्थित होते. ज्यामध्ये डान्सर्स, चित्रपटाची संपूर्ण कास्ट आणि क्रू मेंबर्स यांचा सहभाग होता. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्याने सगळ्यांनीच सेटवरून काढता पाय घेतला. मात्र यात आदितीला सेटवरून बाहेर पडण्यास उशीर लागला. परंतु वेळीच लोक धावून गेल्याने तिला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आगीचे रुद्ररूप वाढत असताना वेळीच आग विझविण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास यश आले. वास्तविक आम्हाला हे गाणे वेळेत शूट करायचे होते. मात्र आग लागल्यामुळे आता हे गाणे पुढच्या शुक्रवारी शूट केले जाणार असल्याचे समजते. दरम्यान, चित्रपटाची शूटिंग सध्या आरके स्टूडिओ येथे सुरू आहे. शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर अभिनेता संजय दत्त याने ‘भूमी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेरी कॉम फेम ओमंक कुमार करत आहेत. तर भूषण कुमार, संदीप सिंग आणि ओमेंग कुमार या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहेत. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या इमोशनल ड्रामावर आधारित आहे. ज्यामध्ये आदिती राव हैदरी संजय दत्तच्या मुलीच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे.