Join us  

आकडे बघा, मग बोला... NCB बॉलिवूडला लक्ष्य करत असल्याच्या आरोपावर 'सिंघम' समीर वानखेडे बेधडक बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 1:47 PM

मीडियाने आर्यनची स्टोरी हायलाईट केली पण...! NCB आणि समीर वानखेडे फक्त बॉलिवूडलाच लक्ष्य करत असल्याचा आरोप आरोप केला जातोय. आता या आरोपांवर खुद्द समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.

ठळक मुद्देसमीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहे. त्यांची पहिली पोस्टींग मुंबई एअरपोर्टमध्ये कस्टम ऑफिसर म्हणून होती

गेल्या दीड वर्षापासून बॉलिवूड सतत ड्रग्ज प्रकरणांमुळेच चर्चेत आहे. बॉलिवूडच्या चकाकत्या दुनियेत खोलपर्यंत रूजलेली ड्रग्जची पाळंमुळं खोदून काढण्याचं काम नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीनं (NCB ) हाती घेतलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अचानक बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि यानंतर इंडस्ट्रीची मोठमोठी नावं एनसीबीच्या रडारवर आलीत. शनिवारी बॉलिवूडचा किंगखान म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) एनसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला. शाहरूखच्या मुलाला थेट अटक करणं सोप्प म्हणता येणार नाही. पण एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी धडक कारवाई केली आणि आर्यनची कालची रात्र कोठडीत गेली. त्याआधी दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर अशा बॉलिवूडच्या बड्या स्टार्सला ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंसमोर चौकशीसाठी हजर व्हावं लागलं. पार्श्वभूमीवर समीर वानखेडे आणि एनसीबी फक्त बॉलिवूडलाच लक्ष्य करत असल्याचा आरोप लावला गेला. आता या आरोपांवर खुद्द समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत समीर वानखेडे यावर बोलले.

काय म्हणाले एनसीबीचे ‘सिंघम’?आम्ही फक्त बॉलिवूडला लक्ष्य करत आहोत, असा आरोप आमच्यावर अनेकदा लागला आहे. पण याला अर्थ नाही. कोण काय म्हणतं यापेक्षा सत्य काय आहे आणि आकडे काय सांगतात, ते महत्त्वाचं आहे. गेल्यावर्षी 10 महिन्यांत आम्ही एकूण 105 लोकांवर गुन्हे दाखल केलेत. यापैकी किती सेलिब्रिटी होते, ते सांगा. फक्त मोजके काही जण. यावर्षीही आम्ही 310 जणांना अटक केली, त्यापैकी किती सेलिब्रिटी आहेत? एनसीबीने 150 कोटी रूपयांची ड्रग्ज जप्त केली, पण याची जराही चर्चा झाली नाही, असे ते म्हणाले...

मीडियाने आर्यनची स्टोरी हायलाईट केली पण...सध्या मीडिया आर्यन खानची स्टोरी चालवतो आहे. पण त्याच्या दोन दिवसांआधी आम्ही 5 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं. पण मीडियाने त्या स्टोरीत अजिबात इंटरेस्ट दाखवला नाही. गेल्या आठवड्यात आम्ही 6 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं. त्याचा संबंध अंडरवर्ल्डशी होता. पण एकाही चॅनलने ही न्यूज दाखवली नाही. आमचा एक सहकारी नायझेरियन ड्रग्ज डिलरला पकडताना जखमी झाला, पण कोणीच ही बातमी उचलून धरली नाही. आम्ही एखाद्या लोकप्रिय वा सेलिब्रिटी व्यक्तिला पकडल्यावर मीडिया त्यावर तुटून पडतो. त्यामुळे आम्ही फक्त बॉलिवूडला लक्ष्य करतो,आरोप आमच्यावर लावू नका, असंही ते म्हणाले. आमची टीम फक्त आपलं काम करते. यात काही सेलिब्रिटी पकडले जात असतील तर त्यांना का सोडायचं? सर्वांसाठी नियम सारखे आहेत आणि नियमांची पायमल्ली करणाºयांना आम्ही सोडणार नाहीच. केवळ ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांना नियम तोडण्याचा अधिकार मिळत नाही. आम्ही केवळ ड्रग्ज पेडलर्सला पकडावं, केवळ झोपडपट्टीत छापे मारावे, असं होणार नाही, असंही ते म्हणाली.

सुशांतचा केस नंबर 16 होता, आर्यनचा 105सुशांत व आर्यन खान या दोन्ही प्रकरणांची जोरदार चर्चा झाली यावर ते म्हणाले, सुशांतच्या केसचा नंबर 16 होता आणि आता आर्यन खानच्या केसचा नंबर 105 आहे. यादरम्यान आम्ही अनेक प्रकरणं दाखल केलीत. पण मीडियाने या प्रकरणांची दखल घेतली नाही. कारण ती माणसं प्रसिद्ध नव्हती. आम्ही 12 ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला. पण त्याचीही मीडियाला दखल घ्यावीशी वाटली नाही, असे ते म्हणाले.

कोण आहेत समीर वानखेडे?समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहे. त्यांची पहिली पोस्टींग मुंबई एअरपोर्टमध्ये कस्टम ऑफिसर म्हणून होती. डेप्युटी कमिशनर ऑफ एअर इंटेलिजन्स युनिट, जॉइंट कमिशनर ऑफ डिरेक्टोरेट एजन्सी आणि जॉईंट कमिशनर ऑफ  डिरेक्टोरेट ऑफ रिव्ह्युन्यु इंटेलिजन्समध्येही त्यांनी काम केलं आहे. सध्या ते एनसीबीमध्ये कार्यरत आहेत. 2013 मध्ये वानखेडे यांनी प्रसिद्ध गायक मीका सिंगला फॉरेन करन्सी प्रकरणात अटक केली होती.   समीर वानखेडे यांनी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरशी लग्न केलं आहे. तिनं 2003 मध्ये अजय देवगणच्या गंगाजलमध्ये काम केलं होतं. 2017 मध्ये क्रांती आणि समीर यांचं लग्न झालं.

टॅग्स :नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोआर्यन खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी