Join us  

नसीरूद्दीन शाह यांना रूग्णालयात भरती केल्याची बातमी आली अन् सगळ्यांना धडकी भरली; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 10:06 AM

अभिनेता इरफान खान गेला. पाठोपाठ  ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. यानंतर अचानक नसीरूद्दीन शाह यांना रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी येऊन धडकली ...

ठळक मुद्देअभिनय संपला तर मी सुद्धा स्वत:ला संपवेल, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी अलीकडे केले होते.

अभिनेता इरफान खान गेला. पाठोपाठ  ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. यानंतर अचानक बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनाही रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी येऊन धडकली आणि चाहत्यांनासोबत बॉलिवूडलाही धडकी भरली. मात्र आम्ही सांगू इच्छितो की, नसीरूद्दीन शाह यांना रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी खोटी असून एक अफवा आहे.

इरफान व ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकूल वातावरण असतानाच काल सोशल मीडियावर नसीरूद्दीन यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी व्हायरल झाली. नसीरूद्दीन शाह गेल्या अनेक दिवसांपासनू आजारी आहेत. मात्र  काल अचानक प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता. या बातमीनंतर नसीरूद्दीन यांच्या घरचे फोन खणखणू लागले. बॉलिवूडमध्ये चिंता पसरली. अखेर नसीरूद्दीन यांनी स्वत: ट्विट करून त्यांच्या प्रकृतीबद्दलचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्ट केले.माझ्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केल्याबद्दल आणि माझी चिंता केल्याबद्दल धन्यवाद. पण मी अगदी ठणठणीत आहे आणि घरी लॉकडाऊनचे पालन करतोय. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले. तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

 नसीरूद्दीन शाह अभिनया इतकेच स्पष्ट वक्तेपणा आणि परखड व्यक्तिमत्वासाठी  ओळखले जातात. अभिनय संपला तर मी सुद्धा स्वत:ला संपवेल, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी अलीकडे केले होते.

अभिनय हा माझा श्वास आहे. माझ्यासाठी प्रेक्षकांना देण्यासारखे खूप काही आहे, या एकाच विश्वासासोबत मी रोज उठतो. अभिनय माझ्या ध्यास आहे. एखाद्या सकाळी उठून मी अभिनय करू शकलो नाही तर मी आत्महत्या करेन, असे मला अनेकदा वाटते. अभिनयाशिवाय आयुष्याची कल्पनाही मी करू शकत नाही, असे ते म्हणाले होते.

टॅग्स :नसिरुद्दीन शाह