Join us  

'मौत मुबारक हो...' नर्गिस दत्त यांनी मीना कुमारी यांना का दिल्या होत्या मृत्यूच्या शुभेच्छा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 11:57 AM

Nargis Dutt on Meena Kumari Death : नर्गिस दत्त यांच्या या वक्तव्यावर फार टिका झाली होती. ज्यानंतर एका लेखातून त्यांनी खुलासा केला की, त्या असं का म्हणाल्या होत्या.

'मौत मुबारक हो मीना कुमारी (Meena Kumari)...अब यहां कभी वापस मत आना ये दुनिया तुम्हारे लिए नहीं है'. ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांच्या निधनानंतर एकीकडे लोक दु:खं व्यक्त करत होते तर दुसरीकडे सुनील दत्त यांची पत्नी आणि संजय दत्तची आई नर्गिसने त्यांना निधनाच्या शुभेच्छा (Nargis Dutt on Meena Kumari Death) दिल्या होत्या. नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांच्या या वक्तव्यावर फार टिका झाली होती. ज्यानंतर एका लेखातून त्यांनी खुलासा केला की, त्या असं का म्हणाल्या होत्या.

रिअल ट्रॅजेडी क्वीन

पडद्यावर मीना कुमारी यांचं आयुष्य खूप भारी राहिलं, पण त्यांचं पर्सनल आयुष्य फारच खडतर होतं. ३३ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ९० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं होतं आणि वयाच्या ३८व्या वर्षी त्यांचं निधन झालं. फार कमी वयात मीना कुमारी यांनी खूप मोठं यश मिळवलं होतं. त्यांनी लपून दिग्दर्शक-लेखक कमाल अमरोही यांच्यासोबत लग्न केलं होतं. ते आधीच विवाहित होते. पण त्यांचा वैवाहिक जीवन फार त्रासदायक ठरलं. अमरोही मीना कुमारी यांना मारहाण करत होते. ज्याला कंटाळून मीना यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी दारूला आपला आधार बनवलं. ज्याने त्यांचं लिव्हर खराब झालं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

नर्गिस का म्हणाल्या मौत मुबारक?

नर्गिस यांना मीना कुमारी यांच्या पर्सनल लाईफबाबत सगळं काही माहीत होतं. मीना कुमारी यांच्या निधनानंतर नर्गिस यांनी एका मॅगझिनमध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं. 'तुला मृत्यूच्या शुभेच्छा. मी याआधी असं कधी बोलले नाही. मीना आज तुला तुझी मोठी बहीण मृत्यूच्या शुभेच्छा देत आहे आणि सांगत आहे की, यात जगात परत कधी येऊ नको. हे जग तुझ्यासारख्या लोकांसाठी नाहीये'. याच आर्टिकलमध्ये नर्गिस यांनी लिहिलं होतं की, 'मीना कुमारीच्या रूममधून ओरडण्याचा आवाज येत होता. एक दिवस मी तिला गार्डनमध्ये पाहिलं आणि म्हणाले की, तुम्ही आराम का करत नाही. तुम्ही खूप थकलेल्या दिसता'.

'तेव्हा त्या बोलल्या होत्या की, बाजी माझ्या नशीबात आराम नाही. मी फक्त एकदाच आराम करेन'. दुसऱ्या दिवशी मी पाहिलं की, तिचे डोळे सुजलेले होते. मी अमरोहीच्या सेक्रेटरीला पकडलं आणि विचारलं की, तुम्ही तिला एकदाच का मारत नाही. मीनाने तुमच्यासाठी खूप काही केलंय. तुम्हाला ती कधीपर्यंत पोसणार'. तेव्हा सेक्रेटरी म्हणाला होता की, 'जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही तिला आराम देऊ'. दरम्यान अमरोही यांना घटस्फोट दिल्यानंतर मीना कुमारीच्या आयुष्यात धर्मेंद्र आले होते. पण नंतर तेही काही कारणाने सोडून गेले होते. 

टॅग्स :मीना कुमारीनर्गिस