Join us  

Republic Day 2023: ‘तिरंगा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या पडद्यामागची ‘ही’ स्टोरी तुम्हाला माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 8:00 AM

बॉलिवूडमध्ये अनेक देशभक्तीपर चित्रपट बनले. हे चित्रपट बघून ऊर अभिमानाने भरून येतो. राज कुमार (Raaj Kumar ) आणि नाना पाटेकर (Nana Patekar ) यांचा ‘तिरंगा’ (Tiranga) हा असाच एक देशभक्तीपर सिनेमा.

Republic Day 2023 : बॉलिवूडमध्ये अनेक देशभक्तीपर चित्रपट बनले. हे चित्रपट बघून ऊर अभिमानाने भरून येतो. राज कुमार (Raaj Kumar ) आणि नाना पाटेकर (Nana Patekar ) यांचा ‘तिरंगा’ (Tiranga) हा असाच एक देशभक्तीपर सिनेमा. ‘तिरंगा’ हा सिनेमा आठवला की, राज कुमार आणि नाना पाटेकर  यांचा चेहरा क्षणात डोळ्यांपुढे येतो. दोघांचाही रूबाब वेगळा आणि दोघंही तोडीस तोड. नाना आणि राज कपूर यांची पडद्यावरची जुगलबंदी पाहताना लोक हरवून जात. अगदी आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की, प्रेक्षक सिनेमात हरवतात. पण या चित्रपटामागची एक स्टोरी कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. 

नाना व राज कुमार दोघंही त्यांच्या जबरदस्त डायलॉग डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध होते. तेवढेच स्वभावानेही फटकळ होते. साहजिकच, या दोघांना एकत्र आणणं सोप्प नव्हतं. दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी एका मुलाखतीत या दोघांच्या सनकी स्वभावाबद्दल सांगितलं होतं.

राज कुमार व नाना पाटेकर या दोघांचं परस्परांशी अजिबात पटायचं नाही. तरिही दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी या दोन्ही कलाकारांना चित्रपटात एकत्र आणण्याचं धाडस दाखवलं होतं. चित्रपटात या दोन्ही दिग्गजांची अफलातून केमिस्ट्री दिसली. पण पडद्याआड हा चित्रपट शूट होत होता तेव्हा काय तर, दोघंही एकमेकांशी बोलणं तर दूर चक्क एकमेकांकडे पाठ करून बसायचे.

‘तिरंगा’साठी राज कुमार यांचं नाव फायनल होतं. दुसऱ्या भूमिकेसाठी मेहुल कुमार यांना नाना हवे होते. पण राज कुमार म्हणजे पूर्व आणि नाना म्हणजे पश्चिम हे त्यांना ठाऊक होतं. अनेकांनी मेहुल यांना या दोघांना एका सिनेमात घेणं जिकरीचं असल्याचं सांगत, असं न करण्याचा सल्ला दिला होता. पण मेहुल कुमारांना नानाचं हवे होते. त्यांनी नानांना फोन केला. नानांनी मेहुल यांचं म्हणणं आधी ऐकून घेतलं आणि मग थेट थेट नकार कळवला. कारण काय दिलं तर, ‘मी कमर्शिअल सिनेमे करत नाही’ असं.

पण मेहुल कुमारही पिच्छा सोडणा-यांपैकी नव्हतेच. एकदा स्क्रिप्ट ऐका तर, अशी विनंती त्यांनी केली आणि कसेबसे नाना तयार झालेत. मेहूलकुमार स्क्रिप्ट ऐकवायला नानांच्या घरी पोहोचलेत. नानांना स्क्रिप्ट आवडली आणि त्यांनी सिनेमाला होकार दिला. पण अर्थात त्यांची एक अट होती. सिनेमासाठी राज कुमार यांचं नाव फायनल झाल्याचं नानांना ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वकी अट ठेवली होती. राज कुमार यांनी माज्या कामात जराही हस्तक्षेप केला तर मी त्या क्षणी चित्रपट सोडून जाणार. जे काही नुकसान होईल, त्याला मी जबाबदार असणार नाही, असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट सांगितलं. मेहुल कुमार यांनी ही अट अर्थातच मान्य केली.

नानाचा होकार मिळाला आणि मेहूलकुमार यांनी लगेच राजकुमार यांना फोन करून ही बातमी दिली. पण नाना पाटेकर यांचं नाव ऐकताच राजकुमार प्रचंड बिथरले. त्याला का घेतलं? हा त्यांचा पहिला प्रश्न होता. सेटवर तो शिवीगाळ करतो असं मी ऐकलं आहे,हे त्याचं दुसरं वाक्य. अर्थात याऊपरही मेहुल कुमार यांनी कशीबशी राजकुमार यांची समजूत काढली आणि चित्रपटाच्या सेटवर दोघं एकत्र आलेत.

शूटींग सुरु झालं. शूटींगच्या पहिल्या दिवशी सेटवर प्रचंड टेन्शन होतं. मेहुल कुमार तर जाम दहशतीत होते. कशावरूनही जराही बिनसलं तर अख्खा सिनेमा रखडणार, याची त्यांना कल्पना होती. पण हळूहळू टेन्शन विरलं. नाना व राज कुमार सेटवर एकमेकांशी चकार शब्दही बोलले नाहीत. दोघंही एकमेकांपासून दूर एकमेकांकडे पाठ करून बसले. पण शॉट रेडी झाला आणि दोघंही सगळं विसरले. कामाच्या आड त्यांनी मतभेद येऊ दिले नाहीत. सिनेमा पूर्ण झाला, रिलीज झाला आणि सुपरडुपर हिट ठरला...आजही हा सिनेमा सुपरडुपर हिट आहे!

टॅग्स :नाना पाटेकरराज कुमार