Join us  

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ वादाच्या भोव-यात, अमिताभ बच्चन यांनाही नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 10:13 AM

अमिताभ बच्चन सध्या प्रकृतीच्या कारणांनी चर्चेत आहेत. डॉक्टरांनी मनाई केल्यानंतरही अमिताभ सलग शूटींग व प्रोजेक्ट पूर्ण करत आहेत. अशात अमिताभ यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’बद्दल एक निराशाजनक बातमी आहे.

ठळक मुद्दे ‘झुंड’च्या निर्मात्यांनी माझी फसवणूक केली. माझ्यावर दबाव आणला, असा आरोपही नंदी कुमार यांनी केला आहे.

अमिताभ बच्चन सध्या प्रकृतीच्या कारणांनी चर्चेत आहेत. डॉक्टरांनी मनाई केल्यानंतरही अमिताभ सलग शूटींग व प्रोजेक्ट पूर्ण करत आहेत. अशात अमिताभ यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’बद्दल एक निराशाजनक बातमी आहे. होय, अमिताभ बच्चन व मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. पण आता हा चित्रपट वादाच्या भोव-यात अडकला आहे. हैद्राबादमधील चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी ‘झुंड’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कॉपीराईट उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. ‘सैराट’ हा सुपरडुपर हिट मराठी चित्रपट देणारे नागराज मंजुळे ‘झुंड’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.‘झुंड’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. पण आता या चित्रपटाच्या मेकर्सवर कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे.

याप्रकरणी नंदी कुमार यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे, टी-सीरीजचे अध्यक्ष भूषण कुमार, अमिताभ बच्चन आणि चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहेत ते विजय बरसे अशा सर्वांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘झुंड’च्या निर्मात्यांनी माझी फसवणूक केली. माझ्यावर दबाव आणला, असा आरोपही नंदी कुमार यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण नंदी कुमार यांच्या दाव्यानुसार, २०१७ मध्ये त्यांनी ‘स्लम सॉकर’ खिलाडी अखिलेश पॉलच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्यासाठी त्याचे हक्क विकत घेतले. त्यानंतर कुमार यांनी ‘स्लम सॉकर’ या चित्रपटाची योजना आखली. अखिलेश पॉल हा नागपूरच्या झोपडपट्टी भागात राहणारा व्यसनी मुलगा असतो.  त्याला फुटबॉलची आवड असते. फुटबॉलची ही आवड  त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. ११ जून २०१८ रोजी नंदी चिन्नी कुमार यांनी या चित्रपटाच्या कथेची अधिकृतरित्या तेलंगणा सिनेमा रायटर असोसिएशनकडे नोंद केली. पण आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अखिलेश पॉल यांना प्रशिक्षण देणारे विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. या चित्रपटात विजय बरसेसह अखिलेश पॉलचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. म्हणून कुमार यांनी नागराज मंजुळे आणि चित्रटातील काही व्यक्तींवर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली आहे.

टॅग्स :नागराज मंजुळेअमिताभ बच्चन