Join us  

नको तुझी ‘सॉरी’, बोलण्यापूर्वी विचार का केला नाहीस? मुकेश खन्ना सैफवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 2:12 PM

आता म्हणे सैफ माफी मागतोय. व्वा, क्या बात है. बाण सोडा, बॉम्ब फोडा आणि मग सॉरी म्हणा. तुझी सॉरी आम्हाला मान्य नाही, अशा शब्दांत मुकेश खन्ना यांनी सैफला फटकारले.

ठळक मुद्देअलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खान ‘आदिपुरुष’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलता होता.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नुकताच एका मुलाखतीत त्याच्या ‘आदिपुरूष’ या आगामी  सिनेमातील रावणाच्या भूमिकेबद्दल बोलला आणि बोलून फसला. त्याच्या या वक्तव्यावरून जोरदार  वाद पेटला. हा वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच सैफने माफी मागत आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे जाहिर केले. पण आता त्याच्या या माफीनाम्याचीच निंदा होतेय. ‘महाभारत’ या मालिकेत भीष्म पितामहची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी सैफवर जोरदार हल्ला चढवत, संताप व्यक्त केला आहे.एक इन्स्टा पोस्ट शेअर करत मुकेश खन्ना यांनी सैफवर जोरदार टीका केली.

‘सैफला रावणाची भूमिका साकारणे इंटरेस्टिंग वाटतेय. आम्ही रावणाची भूमिका  मनोरंजक पद्धतीने सादर करू, सीताहरणही न्यायसंगत ठरवू, असे सैफ एका मुलाखतीत म्हणाला. हे इतके सोपे आहे, असे सैफला का वाटतेय? लंकेश काही चेंडू नाही, ज्याला तुम्ही वाट्टेल तसे टोलवाल. याला मी सैफचे अज्ञान म्हणून की मूर्खपणा. तुम्ही देशाच्या कोट्यावधी भारतीयांच्या आस्थेशी खेळत आहात, हेही त्याला कळू नये? हिंमत असेल तर दुस-या धर्माबद्दल असे करून दाखव? चांगल्याला वाईट दाखव, वाईटाला चांगले दाखव. आता म्हणे सैफ माफी मागतोय. व्वा, क्या बात है. बाण सोडा, बॉम्ब फोडा आणि मग सॉरी म्हणा. तुझी सॉरी आम्हाला मान्य नाही. बोलण्यापूर्वी विचार का केला नाहीस? ’अशा शब्दांत त्यांनी सैफला फटकारले आहे.

सैफ अली खानने माफी मागितली

सैफ अली खान म्हणाला की, 'माझ्या मुलाखती दरम्यान मी केलेल्या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. लोकांच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. मी माझे वक्तव्य मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो. भगवान राम नेहमीच माझ्यासाठी हिरो राहिले आहेत. आदिपुरूष वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे. आमची संपूर्ण टीम ही महान कथा पडद्यावर साकारण्यासाठी मेहनत घेत आहे'.

रावण खलनायक नव्हता, म्हणणाऱ्या सैफ अली खानवर भडकले राम कदम; म्हणाले...

काय म्हणाला होता सैफ?

अलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खान ‘आदिपुरुष’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलता होता. ‘आदिपुरुष’या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. आम्ही ती अतिशय मनोरंजक पद्धतीने सादर करणार आहोत. रावणाने केलेल्या सीता हरणालाही आम्ही न्यायसंगत दाखवणार आहोत. रावणाला आपण आजपर्यंत खलनायकाच्या भूमिकेत पाहिले. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रामासोबतचे त्याचे युद्ध ही सूडाची कहाणी असल्याचे आम्ही दाखवणार आहोत. जे लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचे नाक कापल्यामुळे सुरू झाले होते, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉयकॉट आदिपुरूष, वेकअप ओमराऊत असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेकांनी सैफला सिनेमातून काढून टाकण्याची मागणीही केली आहे.

टॅग्स :सैफ अली खान मुकेश खन्ना