Join us  

रोज रा. स्व. संघाच्या शाखेत जायचा मिलिंद सोमण, आता केला चकीत करणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:43 AM

मिलिंद सोमण एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही भाग होता.

ठळक मुद्देमिलिंदच्या या पुस्तकाचा काही भाग ‘द प्रिन्ट’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमन सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर Made in India: A Memoir by Milind Soman with Roopa Rai’ हे पुस्तक . होय, या पुस्तकात मिलिंदच्या आयुष्याशी निगडीत अनेक खासगी गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. याच पुस्तकात मिलिंदने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही स्वत:चे विचार मांडले आहेत.

त्याने लिहिले, ‘त्या काळात आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे, माझा संघाच्या शाखेत प्रवेश. आपला मुलगा शाखेत गेल्याने तो शिस्तप्रिय बनेल, त्याचा वळण लागेल, व्यायामाचे महत्त्व कळेल आणि विचारांना योग्य दिशा मिळेल, यावर माझ्या बाबांना ठाम विश्वास होता. माझ्या आजुबाजुचे अनेक तरूण शाखेत जात.  पण शाखेत प्रवेश केल्यानंतर बराच काळ मी प्रतिभावान लोकांच्या मागे लपलो. मला भिती वाटे. शिवाय मला न विचारता, माझ्या मर्जीविरोधात माझ्या आईवडिलांनी मला शाखेत पाठवलेय, याचा मला संतापही यायचा.’

‘आज मी माध्यमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलच्या गोष्टी वाचतो, पाहतो तेव्हा काहीसा चकीत होतो. दर आठवड्याला दर दिवशी संध्याकाळी 6 ते 7 शाखेत काय शिकवले जायचे, हे आजही मला आठवते. आम्ही खाकी पॅन्टमध्ये मार्च करायचो. योगाभ्यास, व्यायाम करायचो. गाणी गायचो. संस्कृत वचनांचे पठण करायचो. शाखेतील सर्व मुलांना हिल स्टेशनवर ट्रेकिंगसाठी नेले जायचे. आम्ही शरीराने तंदुरूस्त राहावे शिवाय चांगले नागरिक बनावे म्हणून हे सगळे केले जायचे. शाखेत गेलेल्यांचे हिंदूंबद्दलचे विचार काय होते, हे मला माहित नाही. पण हो, त्यांनी त्यांचे कुठलेही विचार आमच्यावर लादले नाहीत. माझे वडील संघाचा भाग होते आणि हिंदू असल्याचा  त्यांना सार्थ अभिमान  होता. यात अभिमान करण्यासारखे काय आहे, हे मला कधीच कळले नाही. पण याबद्दल तक्रार करण्यासारखेही काहीही नव्हते,’असेही त्याने या पुस्तकात नमूद केले आहे. 

टॅग्स :मिलिंद सोमण