Join us  

#MeToo: बॉलिवूडच्या ‘संस्कारी बाबू’वर बलात्काराचा आरोप, लेखिका-निर्मातीने सांगितली आपबीती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 9:47 AM

 नाना पाटेकर यांच्यानंतर दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर, मॉडेल जुल्फी सैय्यद यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झालेत. आता बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ अर्थात आलोक नाथ यांच्याबद्दलचेही असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेने वेग घेतला आहे. इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाच्या, गैरवर्तनाच्या अनेक प्रकरणांना तोंंड फुटतेय. नाना पाटेकर यांच्यानंतर दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर, मॉडेल जुल्फी सैय्यद यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झालेत. आता बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ अर्थात आलोक नाथ यांच्याबद्दलचेही असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. होय, पटकथा लेखिका आणि दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी कथितरित्या बॉलिवूडच्या ‘संस्कारी बाबू’वर बलात्काराचा आरोप केला आहे. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहून त्यांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. २० वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या एका ‘संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप १९९० मध्ये अपार लोकप्रीय झालेल्या ‘तारा’ या मालिकेच्या निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. विनता यांनी आपल्या पोस्टमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. पण त्यांचा रोख बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेत ‘संस्कारी बाबू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांच्याकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.

 ‘त्याची पत्नी माझी चांगली मैत्रिण होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या घराजवळ राहायचो आणि आमचे अनेक कॉमन फ्रेन्ड होते. त्यापैकी बहुतांश थिएटरशी जुळलेले होते. त्या काळात मी ‘तारा’ प्रोड्यूस करत होते. या मालिकेचे लेखनही मीच करत होते. तो माझ्या या मालिकेतील लीड हिरोईनच्या मागे पडला होता. पण तिला त्याच्यात जराही रस नव्हता. तो दारूच्या प्रचंड आहारी गेलेला, अतिशय घाणेरडा माणूस होता. पण त्याकाळात तो टीव्हीचा स्टार होता आणि म्हणून त्याचे हे वागणे खपून जायचे. उलट अनेक लोक त्याला असे वागण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. तो माझ्या हिरोईनसोबत गैरवर्तन करायचा. एक दिवस त्याने मर्यादा ओलांडली आणि माझ्या हिरोईनने त्याच्या थोबाडीत लगावली. यानंतर आम्ही त्याला मालिकेतून काढून टाकले. एकदा त्याची पत्नी शहराबाहेर होती. त्याने पार्टी ठेवली. मलाही या पार्टीला बोलवले गेले, अशा पार्टीला जाणे, मित्रांना भेटणे आमच्यासाठी कॉमन होते. त्यामुळे मी या पार्टीला गेले. पण त्या दिवशी पार्टीत माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळण्यात आलं होत. मला विचित्र वाटत होत. रात्री २ च्या सुमारास मी घरी जाण्यासाठी उठले, पण मला कुणीचं ड्राप करण्याबद्दल म्हटलं नाही. त्यामुळे मी एकटीचं घराकडे निघाले. रस्तावर कुणीच नव्हतं. माझं घरही दूर होतं. अशाच अर्ध्या रस्त्यात त्याने माझा रस्ता रोखला. तो गाडीत होता आणि गाडी थांबवून मला घरी सोडण्याचा हट्ट करत होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि गाडीत बसले. गाडीत बसल्यावर त्याने मला बळजबरीने आणखी मद्य पाजले. यानंतर जे काही झाले ते मला फार आठवत नाही. दुस-या दिवशी सकाळी उठले तेव्हा मला प्रचंड वेदना व्हायला लागल्या. माझ्यावर केवळ बलात्कारचं झाला नव्हता तर माझे शोषणही झाले होते. मी बेडवरूनही उठू शकत नव्हते. मी माझ्या काही मित्रांना याबद्दल सांगितलं. पण त्या सर्वांनी मला झाले ते विसरून जा आणि पुढे जा, असे सांगितलं. यानंतर माझी कंपनी बंद झाली आणि मला एका चॅनलमध्ये संधी मिळाली. मात्र त्या अभिनेत्याने त्या चॅनलमध्येही असे काही वातावरणं तयार केलं की, मला ते काम सोडावं लागलं. मी त्या घटनेनंतर का शांत राहिले तर मी खूप दडपणाखाली होते. माझ्याकडे काम नव्हते़ मला नोकरी आणि पैशांची गरज होती. यानंतर खूप हिंमत जुळवून मी वेगवेगळ्या चॅनलसाठी लिहिण्याचं काम केल. पण तोपर्यंत मला चित्रीकरणाची आणि सेटचीही भीती वाटायला लागली होती. मी पराभव मान्य केला होता. त्यानंतर तर माझ्यासाठी जगणेचं कठीण झाले. मी व्यसनांच्या आहारी गेले. २००९ नंतर माझ्या काही मित्रांमुळे माझे आयुष्य पुन्हा रूळावर यायला सुरुवात झाली. पण माझ्या आयुष्याची १० वर्षे त्या व्यक्तिनं नकोशी करून टाकली होती.विनता यांनी यानंतरही बरेच काही लिहिले आहे, त्यांची संपूर्ण पोस्ट बातमी सोबत दिली आहे.

टॅग्स :आलोकनाथ