Join us  

"असं कोण करतं यार..." गिरीजा ओकने शेअर केला शाहरुखचा किस्सा; तुम्हीही कौतुक कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 2:31 PM

जवानशी संबंधित शाहरुखचा एक किस्सा गिरीजाने एका मुलाखतीत शेअर केला.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) पडद्यावर रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्ध आहे. शाहरुख खानला मुलींशी कसं बोलायचं, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी काय करायचं याची जाण आहे. मधल्या काळात शाहरुखची स्तुती करणारे अनेक रील्स व्हायरल होताना आपण पाहतच आहोत. नुकतंच मराठी अभिनेत्री गिरीजा ओकने (Girija Oak) शाहरुखसोबत 'जवान' सिनेमात काम केलं. जवानशी संबंधित शाहरुखचा एक किस्सा गिरीजाने एका मुलाखतीत शेअर केला.

शाहरुख खानचं मन किती मोठं आहे आणि मुलींबाबतीत त्याच्या मनात किती सॉफ्ट कॉर्नर आहे यासंदर्भात आलेला एक अनुभव गिरीजा ओकने 'मिरची प्लस'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. ती म्हणाली,'शाहरुख खान...एका सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात जास्त लोक हे टॉम क्रुझपेक्षा शाहरुखला ओळखतात. इतका तो मोठा आहे.'

ती पुढे म्हणाली,'चेन्नईत एकदा अॅटलीच्या वाढदिवसाला पार्टी होती. त्यानंतर आम्ही मुलीमुलीच हॉटेलवर जाणार होतो. आमचं हॉटेल बरंच लांब होतं. तर शाहरुखने आमच्यासोबत त्याचे दोन सुरक्षारक्षक आणि एक कार पाठवली. ते सुरक्षारक्षक आमच्या लॉबीमध्ये आमच्याबरोबर आले. त्यांनी आम्हाला सुरक्षित लिफ्टपर्यंत पोहोचताना पाहिलं. मग ते गुड नाईट मॅम असं म्हणाले आणि मगच निघाले. तर शाहरुखने त्यांना सूचना केली होती की मुलींना लिफ्टपर्यंत सोडून मगच यायचं. असं कोण करतं यार...तो एक वेगळाच माणूस आहे. हे जे त्याच्याबद्दल आपण सगळं ऐकतो ना ते सगळंच खरं आहे.'

शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमाने आतापर्यंत ५०० कोटी पार केले आहेत. तर अजूनही थिएटरमध्ये शो हाऊसफुल सुरु आहे. गिरीजाने या सुपरहिट सिनेमात शाहरुखच्या गर्ल गँगमधील एकीची भूमिका केली आहे. तिच्याही भूमिकेचं कौतुक होतंय. तर आता शाहरुख आगामी 'डंकी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :गिरिजा ओकशाहरुख खानजवान चित्रपट