Join us

चिन्मय मांडलेकरच्या सिनेमात मनोज वाजपेयी दिसणार मुख्य भूमिकेत, राजकारणावर आधारित असणार ‘गव्हर्नर’ चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 16:44 IST

लवकरच चिन्मय राजकारणावर आधारित असलेला ‘गव्हर्नर’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून चिन्मय मांडलेकर याची ओळख आहे. लवकरच चिन्मय राजकारणावर आधारित असलेला ‘गव्हर्नर’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  हा चित्रपट एक उत्कंठावर्धक राजकीय थ्रिलर असणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं शूटिंग ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर करत असून, निर्मिती विपुल अमृतलाल शाह आणि सहनिर्माते आशीन ए. शाह यांच्या 'सनशाईन पिक्चर्स' बॅनरखाली होणार आहे. गव्हर्नर हा चित्रपट एका माजी राज्यपालाच्या जीवनावर आधारित आहे. या राज्यपालांचं निधन मागील वर्षी झालं असून त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन ही कथा मांडली जाणार आहे. या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर ऑगस्टमध्ये मुंबईसह आणखी दोन शहरांमध्ये सुमारे ४० दिवसांचं शूटिंग पूर्ण करणार आहेत.

‘गव्हर्नर’ची मूळ संकल्पना विपुल अमृतलाल शाह यांनी विकसित केली असून, त्यानंतर त्यांनी सुवेंदू भट्टाचार्य, सौरभ भारत आणि रवी असरानी यांच्यासोबत मिळून या चित्रपटाच्या पटकथेवर काम केलं आहे. मनोज बाजपेयी आणि विपुल शाह यांची ही पहिलीच जोडी असून, त्यांच्या या सहकार्यानं आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

एकीकडे गव्हर्नरच्या तयारीत शाह व्यस्त आहेत, तसंच ते लवकरच त्यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या हिसाब या हाईस्ट थ्रिलर चित्रपटावरही काम करत आहेत, ज्यात जयदीप अहलावत आणि शेफाली शाह मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हिसाब २०२५ च्या उत्तरार्धात प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट देखील सनशाईन पिक्चर्स आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार होत आहे. गव्हर्नर आणि हिसाब या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून विपुल अमृतलाल शाह पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आशयघन आणि दमदार कथा घेऊन येणार आहेत.

टॅग्स :चिन्मय मांडलेकरमनोज वाजपेयी