Join us  

निराश होऊन आत्महत्या करणार होता मनोज वाजपेयी, या ‘सत्या’ने दिल्यात अनेक अग्निपरीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 10:04 AM

मनोज वाजपेयीचा आज वाढदिवस

ठळक मुद्देप्रकाश झा यांच्या ‘राजनीति’ या चित्रपटानंतर मनोज वाजपेयीच्या नावाची चर्चा होऊ लागली.

हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी याचा आज (२३ एप्रिल) वाढदिवस. २३ एप्रिल १९६९ रोजी जन्मलेला मनोज म्हणजे, एका शेतक-याचा मुलगा. खरे तर मनोजने डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण मनोजला डॉक्टर नाही तर अभिनेता बनायचे होते. मनोजचे नाव अभिनेता मनोज कुमार यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते, कदाचित त्यामागेही नियतीच असावी. आज मनोज वाजपेयी बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो, पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास ब-याच अग्निपरीक्षेने भरलेला होता.

 

शाळेच्या दिवसांत मनोज प्रचंड लाजाळू स्वभावाचा होता. त्याचा हा लाजाळू स्वभाव बदलावा म्हणून शाळेतील शिक्षक त्याला वर्गात उभे राहून हरिवंश राय बच्चन यांची कविता म्हणायला सांगायचे.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, मनोजला एकदा नव्हे तर तीन वेळा एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ड्रामामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे मनोज खचला. नसीरूद्दीन शहा, ओम पुरीसारखे दिग्गज स्टार एनएसडीतून घडले. त्यामुळेच एनएसडीत प्रवेश हे मनोजचे स्वप्न होते. त्याने या स्वप्नाचा पिच्छा पुरवत चौथ्यांदा प्रवेशासाठी अर्ज केला. पण याहीवेळी त्याला नकार मिळाला. आता तर त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागलेत़ याचदरम्यान रघुवीर यादव यांनी त्याला अ‍ॅक्टिंग वर्कशॉप करण्याचा सल्ला दिला.

  १९९८ मध्ये प्रदर्शित राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ने मनोज वाजपेयी या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण त्याआधी एक काळ असाही होता, जेव्हा लोक त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. एका मुलाखतीत खुद्द मनोजने ही खंत बोलून दाखवली होती. त्याने सांगितले होते की, ‘तो एक काळ होता, जेव्हा मीडिया मला जराही भाव द्यायचा नाही. मी कुठल्याही पार्टीला गेलो आणि मीडियाचे कॅमेरे चुकून माझ्याकडे वळले तरी लगेच ते दुस-या बाजूला वळवले जायचे.’

अमृता प्रीतम यांची गाजलेली कादंबरी ‘पिंजर’वर आधारित ‘पिंजर’ याच नावाच्या चित्रपटासाठी मनोजला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर कतरीना कैफने सर्वांदेखत मनोज वाजपेयीच्या पायांना स्पर्श करत, याआधी मी आयुष्यात कधीही असा अभिनय पाहिला नाही, असे म्हटले होते.

प्रकाश झा यांच्या ‘राजनीति’ या चित्रपटानंतर मनोज वाजपेयीच्या नावाची चर्चा होऊ लागली आणि बॉलिवूडमध्ये त्याला एक नवी ओळख मिळाली.  

टॅग्स :मनोज वाजपेयी