Join us  

प्रवेश नाकारलेल्या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून पोहचला मनोज वाजपेयी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2017 1:28 PM

‘तुम्ही मला काही विचारणार, त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. ज्या स्कूलमध्ये मला अ‍ॅडमिशन मिळाले नव्हते त्याच स्कूलमध्ये ...

‘तुम्ही मला काही विचारणार, त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. ज्या स्कूलमध्ये मला अ‍ॅडमिशन मिळाले नव्हते त्याच स्कूलमध्ये मला प्रमुख अतिथी म्हणून बोलावले जाते’ अशा तयारीनिशी अभिनेता मनोज वाजपेयी एनएसडीच्या १९ व्या भारत रंग महोत्सवात पोहचला होता. शालेय जीवनात प्रवेश नाकारलेल्या एनएसडीमध्ये पोहोचलेला मनोज वाजपेयीचा आजही शाळेविषयी तक्रारविषयकच सूर असल्याचे बघावयास मिळाले.  संघर्षपूर्ण आयुष्य असलेला मनोज वाजपेयी जेव्हा एनएसडीमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. प्रयत्न करूनही त्याला अ‍ॅडमिशन दिले गेले नाही. मात्र त्या आठवणी अजूनही त्याच्या स्मरणात असल्याचे बघावयास मिळाले. कारण तो काही तरी तक्रार करतोय अशाच अंदाजात त्याचा बोलण्याचा स्वर होता. तो म्हणाला की, एनएसडीने मला जरी शिक्षण घेण्याची संधी दिली नसली तरी, शिकविण्याची संधी मात्र निश्चितच दिली आहे. विशेष म्हणजे अध्यापनासाठी एनएसडीने दिलेला धनादेश अद्यापही वटविला नसल्याचेही त्याने सांगितले.  जेव्हा त्याला एनएसडीत कशासाठी यायचे होते असे विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटले की, जर मला एनएसडीमध्ये अ‍ॅडमिशन मिळाले असते तर माझ्या आयुष्यातील बराचसा संघर्ष कमी झाला असता, जो मला बाहेर शिक्षण घेताना करावा लागला. एनएसडीमध्ये जर मला उत्कृष्ट रंगकर्मींकडून ट्रेनिंग मिळाली असती तर जो अभिनयातील क्राफ्ट असतो तो शोधण्यास मला मदत झाली असती. जेव्हा मला प्रवेश नाकारला तेव्हा मी, देवेंद्र राज अंकुर याच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एनएसडी पासआउट विद्यार्थ्यांची ट्रेनिंग जॉइन केली होती, असेही त्याने सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना अभिनयातील अनुशासनाचे धडे देताना मनोजने म्हटले की, एका अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात अनुशासन आणि नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असते. जर तुम्हाला यशस्वी अभिनेता व्हायचे असेल तर सकाळीच तुमची रिहर्सल सुरू व्हायला हवे. तुमची एक वेगळी जीवनशैली आहे याचा तुम्ही नेहमीच विचार करायला हवा. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात एक रोल मॉडल असून चालणार नाही. तर तुमचे रोल मॉडल बदलायला हवेत. तुमच्या अभिनयाच्या परिपक्वतेनुसार तुम्ही तुमचे रोल मॉडल बदलू शकता, असेही तो म्हणाला. यावेळी मनोज वाजपेयी याने सेन्सॉर बोर्डावरून सुरू असलेल्या वादावरही आपले मत व्यक्त केले. त्याने म्हटले की, लोकशाहीप्रधान आपल्या देशातील सेन्सॉर बोर्ड खूपच अलोकशाही पद्धतीने निर्णय देतो. खरं तर सिनेमाच्या आयुष्यमानाचा विचार करून बोर्डाने केवळ सर्टिफिकेट देण्याचे काम करायला हवे. मात्र याच्या विपरीत परिस्थिती आपल्याला बघावयास मिळत असल्याने डिजिटल युगात सेन्सॉर बोर्ड त्याचे महत्त्व कमी करताना दिसत असल्याचेही तो म्हणाला.