Join us  

कलंक या चित्रपटाबद्दल करण जोहरने विचारल्यानंतर अशी होती माधुरी दीक्षितची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 1:33 PM

कलंक या चित्रपटात भूमिका साकारण्याबाबत करणने विचारल्यानंतर माधुरीची प्रतिक्रिया काय होती हे तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे.

ठळक मुद्देकरणने मला श्रीदेवीची भूमिका साकारण्याबद्दल विचारले त्यावेळी मी चांगलीच भावूक झाली होती. ही भूमिका अतिशय उत्तमप्रकारे साकारण्याची माझी इच्छा आहे.

करण जोहरच्या कलंक या चित्रपटात श्रीदेवी एका महत्त्वाच्या भूमिकेत होत्या हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांनी हा चित्रपट गेल्या वर्षी साईन केला होता. पण फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या निधनानंतर करण जोहरने श्रीदेवी साकारत असलेल्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितला विचारण्यात आले आणि तिने देखील या भूमिकेसाठी लगेचच होकार दिला. 

कलंक या चित्रपटात भूमिका साकारण्याबाबत करणने विचारल्यानंतर माधुरीची प्रतिक्रिया काय होती हे तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. करणने माधुरीला या भूमिकेबद्दल विचारल्यानंतर ती चांगलीच भावुक झाली होती. याविषयी माधुरी सांगते, करणने मला श्रीदेवीची भूमिका साकारण्याबद्दल विचारले त्यावेळी मी चांगलीच भावूक झाली होती. ही भूमिका अतिशय उत्तमप्रकारे साकारण्याची माझी इच्छा आहे. या मालिकेच्या सेटवर असताना किंवा या चित्रपटाचे चित्रीकरण करताना ही इतर भूमिकांप्रमाणेच एक भूमिका आहे हाच विचार करून मी काम करत आहे. त्यामुळे माझ्यावर काम करताना दडपण येत नाही.

कलंक या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी माधुरी सांगते, या भूमिकेबाबत मी जास्त बोलू शकत नसल्याने मी काय सांगू तेच मला कळत नाहीये. चित्रपट पाहिल्यानंतरच माझी भूमिका काय आहे हे प्रेक्षकांना कळेल. या चित्रपटाचा काळ हा १९४० मधील आहे. त्यामुळे माझी भूमिका, लूक खूपच वेगळा असणार आहे. मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी आहे.

कलंक या चित्रपटाची निर्मिती करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन करत असून या चित्रपटात अलिया भट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

कलंक या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात आपल्याला अनेक वर्षांनंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांना एकत्र पाहायला मिळणार आहे. त्या दोघांनी साजन, खलनायक यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

 

टॅग्स :माधुरी दिक्षितकलंकआलिया भटवरूण धवनसंजय दत्त