Join us  

का साईन केला ‘साजन’? माधुरी दीक्षितने 29 वर्षांनंतर सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 5:57 PM

माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि सलमान खान यांच्या ‘साजन’ या सिनेमाला 29 वर्षे पूर्ण झालीत.

ठळक मुद्देसाजन हा सिनेमा 1991 मध्ये रिलीज झाला होता. लॉरेन्स डिसुजा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.

माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि सलमान खान यांच्या ‘साजन’ या सिनेमाला 29 वर्षे पूर्ण झालीत. हा सिनेमा आजही सिनेप्रेमी विसरू शकलेले नाही. या सिनेमाची गाणी इतकी गाजलीत की, आजही ती गाणी कानात रूंजी घालतात. चित्रपटातील माधुरीचा डान्स आणि तिचे मनमोहक हास्याने करोडो लोकांना अक्षरश: वेड लावले होते. या सिनेमाने माधुरीच्या फिल्मी करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. कदाचित म्हणूनच माधुरी हा सिनेमा विसरू शकलेली नाही.‘साजन’ला 29 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माधुरीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा सिनेमा का साईन केला होता, याचे कारणही तिने सांगितले.

तिने लिहिले, ‘साजन या सिनेमाला 29 वर्षे पूर्ण झालीत. या सिनेमाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी लगेच या सिनेमाला होकार दिला होता. सिनेमाची स्टोरी रोमॅन्टिक होती. संवादही काव्यात्मक होते आणि चित्रपटाचे संगीतही गजब होते.’ आपल्या पोस्टसोबत माधुरीने एक फोटोही शेअर केला. या फोटोत माधुरी, सलमान व संजय दत्त दिसत आहेत.

साजन हा सिनेमा 1991 मध्ये रिलीज झाला होता. लॉरेन्स डिसुजा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. खरे तर या सिनेमासाठी माधुरी ही दिग्दर्शकाची पहिली पसंत नव्हतीच. दिग्दर्शकाने या सिनेमासाठी आयशा जुल्काला साईन केले होते. पण ऐनवेळी ती आजारी पडली आणि तिच्या जागी माधुरीची वर्णी लागली होती. अमनच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक आमिर खानला घेऊ इच्छित होते. पण दिग्दर्शक नवा आहे, या कारणाने आमिरने हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याच्याजागी संजय दत्तला घेण्यात आले होते. याच सिनेमाच्या सेटवर माधुरी व संजय दत्तच्या प्रेमाच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या.

टॅग्स :माधुरी दिक्षित