Join us  

Lokmat ने केला उद्योगक्षेत्रातील हिरकणींचा सन्मान सोहळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 2:00 PM

या सोहळ्याला अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता वरूण धवनने उपस्थिती लावून चारचाँद लावले. अनुष्का व वरुणच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.

नुकतेच दैनिक लोकमत आयोजित महिला उद्योजिकांच्या सन्मान सोहळा पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठया दिमाखात पार पडला. या सोहळ्यात एटी ऑईलच्या डिरेक्टर अलंक्रित राठोड, साई इस्टेट ग्रुपच्या  स्वाती आणि अमित वाधवानी आणि रिजेशन्सी ग्रुपचे संजय अग्रवाल यांचीही या सोहळ्यात विशेष उपस्थिती होती. यावेळी यांच्या हस्ते इतर महिला उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता वरूण धवनने उपस्थिती लावून चारचाँद लावले. अनुष्का व वरुणच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला. 

समाजात आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी स्वयंरोजगारातून स्वतःचं वेगळं स्थान मिळवलं आहे. यांत आवर्जून उल्लेख करावा लागेल तो महिलांचा. महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही हे तर आपण सगळेच जाणतो. मात्र कठीण परिस्थितीतही ती हिरकणी आहे. कितीही संकटं आली तरी त्याला तोंड देण्याची आणि त्याचा सामना करण्याची धमक समाजातील महिलांमध्ये आहे. परिस्थितीपुढे हार न मानणाऱ्या आणि कुणाचीही मदत न करता स्वकर्तृत्वावर समाजातील काही महिलांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज त्यांची ओळख फक्त एक महिला नसून यशस्वी उद्योजिका आहे. स्वयंरोजगार आणि स्वतःचं कर्तृत्व आणि हिंमतीच्या जोरावर या महिलांनी यशाला गवसणी घातली आहे. अशाच काही यशस्वी महिला उद्योजिकांचा यावेळी  गौरव करण्यात आला.

या महिलांनी स्वयंरोजगारातून स्वतःचा उत्कर्ष साधला असं नाही तर समाजासाठी त्या दिशादर्शक ठरल्या आहे. इतकंच नाही तर त्यांच्या स्वयंरोजगारामुळे अर्थव्यस्थेतही मोलाचं योगदान दिलं आहे. असे मत अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने लोकमतच्या महिला उद्योजिकांच्या सन्मान सोहळ्यात व्यक्त केले. अनुष्का शर्मा व वरूण धवन यांचा आगामी चित्रपट 'सुई-धागा'चा ट्रेलर दाखवण्यात आला व त्यांनी चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले. 'सुई धागा' सिनेमात स्वयंरोजगाराची ताकद आणि स्वतःच्या हिंमतीवर काहीही करु शकतो हे दाखवण्यात आले आहे. 

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अनुष्काने म्हटले की, सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या माझ्यावरील मीम्समुळे माझे काय कुणाचेच नुकसान होणार नाही. उलट फायद्याचे आहे. यामुळे चित्रपट व माझ्या व्यक्तिरेखेबद्दल लोकांच्या मनात कुतूहुल निर्माण झाले आहे आणि या उत्सुकतेपोटी लोक हा सिनेमा आवर्जुन पाहतील, असे अनुष्का यावेळी सांगत होती. यावेळी बोलताना वरूण धवनने वडिलांनी त्याला दिलेला कानमंत्र कुठला ते सांगितले. ‘शूटींगवेळी प्रत्येक शॉट शेवटचा शॉट समज’, असा सल्ला मला वडिलांनी दिला होता. पप्पांचा हा सल्ला मी कधीच विसरत नाही, असे वरूणने सांगितले. 

टॅग्स :अनुष्का शर्मासुई-धागावरूण धवन