Join us  

LMOTY 2020: महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानतो सोनू सूद, कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिनेत्याचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 4:21 PM

मूळचा पंजाबचा असलेला सोनू सूद जवळपास २५ वर्षांपासून महाराष्ट्रात राहतो आहे.

अभिनेता सोनू सूदने आपल्या अभिनय कौशल्यासोबतच अनेकांना मदत करून लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. नुकतेच सोनू सूदने लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड २०२० सोहळ्यात उपस्थिती लावली. मूळचा पंजाबचा असलेला सोनू सूद जवळपास २५ वर्षांपासून महाराष्ट्रात राहतो आहे. इथे येऊनच त्याने आपल्या बॉलिवू़डमधील कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यामुळे तो महाराष्ट्र त्याची जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी आहे असे सोनू सूदने या सोहळ्यात सांगितले.

यावेळी सोनू सूद म्हणाला की, जवळपास २५ वर्षे मी महाराष्ट्रात राहिलो आहे. भरपूर काही मला महाराष्ट्राने दिले आहे. ही माझी जन्मभूमी नाही पण कर्मभूमी आहे. कर्म जन्मापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. मी स्वप्न घेऊन इथे आलो होतो. स्वप्ने अजूनही बाकी आहेत. इथेपर्यंत पोहचलो आहे तर तिथपर्यंत नक्कीच पोहचेन.

मुंबई शहराबद्दल सोनू सूदने सांगितले की, मुंबई शहर हे स्वप्नाची नगरी आहे. इथे लोक खूप स्वप्न उराशी बाळगून येतात. इथला प्रवास खडतर आहे. इथे स्वप्नांवर विरर्जनदेखील तितक्याच लवकरच पडते. मला साडे तीन वर्षानंतर काम मिळाले होते. मी खूप ऑडिशन दिले बोरीवली ते चर्चगेट असा मी ट्रेनने दररोज प्रवास करायचो. मला यादरम्यानचे प्रत्येक स्टेशन आजही माहित आहे. 

मुंबईतील स्ट्रगलबद्दल सांगताना त्याने या शहरात स्वप्न घेऊन येणाऱ्यांना कानमंत्रही दिला. माझ्या वडिलांनी मला मुंबईत फ्लॅट घे असे सांगितले होते. एकुलता एक मुलगा आहे. स्ट्रगल करायची काय गरज आहे, असे त्यांचे म्हणणे होते. पण मला त्या संघर्षातून जाणेदेखील महत्त्वाचे वाटले. मला ट्रेनने, ऑडिशनमधून मिळालेल्या नकारातून, इथल्या रस्त्यांनी मला जे शिकवले आहे जे मला शाळा, कॉलेज किंवा कोणत्याच शिक्षकांनी शिकवले नाही. जीवनातील सर्वोत्कृष्ट शिकवण तुम्हाला मुंबईची ट्रेन, रस्ते, ऑफिसमधून मिळणाऱ्या नकारातून मिळेल. पण हार मानू नका. जिद्द ठेवा नक्कीच यश तुम्हाला मिळेल, असे सोनू यावेळी बोलत होता.

सोनू सूद मुंबईत कामासाठी स्ट्रगल करत असताना त्याला पहिली संधी एका जाहिरातीसाठी दिल्लीत मिळाली. त्यानंतर त्याने तामिळ सिनेमात एक भूमिका केली. त्यानंतर त्याने तामिळ, तेलगू, कन्नड या सिनेमांमध्ये अभिनयाला सुरुवात केली. त्यासाठी या भाषा त्याला शिकाव्या लागल्या. २००२ साली 'शहिद-ए-आझम' या हिंदी सिनेमातून सोनूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर युवा,आशिक बनाया आपने, शूट आऊट अॅट वडाला, जोधा अकबर, दबंग, हॅप्पी न्यू ईयर, पलटन, आर राजकुमार अशा काही हिंदी चित्रपटात त्याने काम केले.

टॅग्स :सोनू सूदलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023