Join us

आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात - गुलशन देवैया

By तेजल गावडे | Updated: November 25, 2018 21:00 IST

अभिनेता गुलशन देवैया याची क्राईम ड्रामावर आधारीत 'स्मोक' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

ठळक मुद्दे'मर्द को दर्द नहीं होता है' या सिनेमात गुलशनचा डबल रोलडबल रोल करणे खूप चॅलेंजिंग - गुलशन

'शैतान', 'हेट स्टोरी' व 'हंटर' या हिंदी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारा अभिनेता गुलशन देवैया याची क्राईम ड्रामावर आधारीत 'स्मोक' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

तुझ्या 'स्मोक' या वेबसीरिजबद्दल सांग?'स्मोक' हा क्राईम ड्रामा आहे. ही वेबसीरिज फक्त गोवा किंवा ड्रग्जवरच भाष्य करत नाही तर लालच व सत्तेवर देखील भाष्य करते. मी बिहारी गँगस्टरची भूमिका यात केली आहे. जो बिहारमधून गोव्यात येतो आणि गोवा त्याला आवडतो व तो तिथेच राहण्याचा निर्णय घेतो. या वेबसीरिजचा अनुभव खूप चांगला होता. यात खूप चांगले कलाकार होते. त्यांच्यासोबत काम करायला खूप मजा आली. त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले.  'कमांडो ३' चित्रपटात तू निगेटिव्ह भूमिका करतो आहेस, त्याबद्दल सांग?'कमांडो ३' चित्रपटाचा एक शेेड्युल युकेमध्ये पूर्ण झाले आहे. विद्युत जामवालसोबत माझी देखील करियरची सुरूवात २०११मध्ये एकत्र झाली होती. तो कमालचा मार्शल आर्ट्स आहे. आमच्या दोघांचे कौशल्य वेगवेगळे आहे. आम्ही एकमेकांच्या अपोझिट काम केले आहे. ते खूप इंटरेस्टिंग आहे. आम्ही एकमेकांचे स्पर्धक जरी असलो तरी आम्ही एकमेकांचे चाहते आहोत. कमांडो चित्रपटाच्या तिसऱ्या भागात प्रेक्षकांना नक्कीच वेगळेपण अनुभवायला मिळेल आणि यातील माझे काम प्रेक्षकांना आवडेल अशी मला आशा आहे.

'मर्द को दर्द नहीं होता है' या तुझ्या आगामी चित्रपटाबद्दल सांग?'मर्द को दर्द नहीं होता है' या सिनेमात मी डबल रोल केला आहे. एक कराटे मास्टर आहे तर दुसरा छोटा गुंडा आहे. चित्रपट खूप चांगला झाला आहे. मामिमध्ये हा चित्रपट दाखवला गेला. या चित्रपटाची खूप प्रशंसा झाली आहे. मला आशा आहे की हा चित्रपट आवडेल. खूप मनोरंजक चित्रपट व कथा आहे. हा चित्रपट रसिकांना नक्कीच आवडेल आणि हा सिनेमा ब्लॉकब्लास्टर ठरेल अशी मला आशा आहे. 

दुहेरी भूमिका करणे चॅलेंजिंग वाटले का?हो. डबल रोल करणे खूप चॅलेंजिंग असते. टेक्निकल असते. मला आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात.  आव्हानांवर  मात करायला मजा येते. साडेचार ते पाच महिने मी या सिनेमाची तयारी केली होती. यात फाईट सिक्वेंस खूप आहेत. त्यासाठी मला कराटेचे प्रशिक्षण घ्यावे लागले. एकाच सीनमध्ये तुम्ही आमनेसामने असतात आणि फायटिंग किंवा सीन बोलायचे असतात. अशावेळी खूप टेक्निकल अभिनय असतो. मला असा अभिनय करायलादेखील मजा आली. 

तुला बॉक्सिंग खेळात रस आहे, हे खरे आहे का?हो. बॉक्सिंग मला खूप आवडते आणि मी गेल्या चार-पाच महिन्यांपासून बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतो आहे.