Join us  

लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी त्यांची बहीण मीना मंगेशकर-खडीकर त्यांना देणार ही खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 11:28 AM

लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाची घोषणा करण्यात आली असून मीना मंगेशकर-खडीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.

आपल्या आवाजाच्या जादूने देशाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदींना कोणी ओळखत नाही, असे होणे भारतात तरी शक्य नाही. गेल्या सात दशकांपासून त्या आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्या लवकरच 90 व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. हे औचित्य साधून मीनाताई मंगेशकर-खडीकर लिखित 'मोठी तिची सावली' पुस्तकाची घोषणा करण्यात आली आहे. लता मंगेशकर यांना गाण्याचा वारसा त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळाला. आजपर्यंतच्या कारकीर्दीत लतादीदींनी ७ दशकांमध्ये १००० हून अधिक हिंदी सिनेमांची गाणी आणि ३६ हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. 

हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर-खडीकर, प्रकाशक आप्पा परचुरे, अविनाश प्रभावळकर (अध्यक्ष-हृदयेश आर्ट्स) यांच्या उपस्थितीत प्रभुकुंज येथे 'हृदयेश आर्ट्स' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लता मंगेशकर  यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाची घोषणा करण्यात आली. मीना मंगेशकर-खडीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केलेले असून परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.

करोडो लोकांच्या मनावर आपल्या सुमधूर आवाजाने मोहिनी घालणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान असणार्‍या महान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जीवन कथा सांगणारे मीना मंगेशकर-खडीकर लिखित आणि प्रकाशक आप्पा परचुरे प्रकाशित 'मोठी तिची सावली' हे पुस्तक लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील अनेक मनोरंजक घटनांचा या पुस्तकात समावेश असणार आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहोळा २८ सप्टेंबर रोजी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंत्री विनोद तावडे या सोहोळ्याचे मुख्य अतिथी असणार असून सोहोळ्याचे अध्यक्षस्थान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे भूषविणार आहेत. पं. शंकर अभ्यंकर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असून आप्पा परचुरे आणि प्रवीण जोशी यांसमवेत अनेक मान्यवर या सोहोळ्यास उपस्थित राहाणार आहेत. 

टॅग्स :लता मंगेशकर