Join us  

Kishore Kumar : कामाचं पूर्ण मानधन न मिळाल्याने अर्धाच मेकअप करून सेटवर आले होते किशोर कुमार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 4:49 PM

किशोर कुमार एका सिनेमाचं शूटींग करत होते. बराच वेळ ते आले नाहीत. पण जेव्हा थोड्या वेळाने ते आले तेव्हा सगळेच त्यांना पाहून हैराण झाले.

गायक किशोर कुमार यांची आज जयंती आहे. किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्यप्रदेशात झाला.किशोर कुमार जिवंत नसले तरी आजही चाहत्यांच्या मनात त्यांची क्रेझ कायम आहे. आजही त्यांची गाणी, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत. 

बॉलिवूडमधील सर्वात गमतीदार व्यक्तीचा विषय निघतो तेव्हा त्यात किशोर कुमार यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. ते त्यांच्या काळातील सर्वात बिनधास्त व्यक्ती मानले जातात. किशोर कुमार यांच्या करिअरची सुरूवात तर तशी काही फार खास राहिली नाही. पण त्यांच्या मोठ्या भावाची इच्छा होती की, त्यांनी अभिनयात पुढे जावं. मात्र, सुरूवातीचे त्यांचे सिनेमा फ्लॉप गेले. कारण अभिनयात त्यांचं मन लागत नव्हतं. सोबतच त्यांना गाण्याचा चान्सही मिळत नव्हता.

पण नंतर एक वेळ अशी आली की, त्यांच्या काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवला. स्क्रीनवरील त्यांचा बिनधास्त अंदाज लोकांना पसंत पडत होता. त्यानंतर किशोर कुमारही अभिनयात रमले होते. थोड्या काळाने त्यांना गाण्यासाठीही संधी मिळू लागल्या होत्या. त्यानंतर किशोर कुमार यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. किशोर कुमार यांच्या पर्सनॅलिटीत असं काहीतरी होतं जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवत होतं. पैशांच्या बाबतीत किशोर कुमार चोख होते. त्यांचा एकच फंडा होता नो पेमेंट, नो वर्क. असाच एक किस्सा त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 एका रिपोर्टनुसार, किशोर कुमार एका सिनेमाचं शूटींग करत होते. शूटींग सेटवर किशोर कुमार यांची सगळे वाट बघत होते. बराच वेळ ते आले नाहीत. पण जेव्हा थोड्या वेळाने ते आले तेव्हा सगळेच त्यांना पाहून हैराण झाले. किशोर कुमार सेटवर केवळ अर्धा मेकअप करूनच आले होते. जेव्हा त्यांना सिनेमाच्या दिग्दर्शकांनी याबाबत विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, निर्मात्यांनी त्यांना आतापर्यंत या सिनेमात काम करण्यासाठी केवळ अर्धच पेमेंट केलंय. त्यामुळे ते अर्धच मेकअप करून आलेत. दिग्दर्शकांनी त्यांना खूप मनवण्याचा प्रयत्न केला, पण ते अडून बसले होते. 

टॅग्स :किशोर कुमार