Join us  

किशोर कुमार यांच्या पहिली पत्नी होत्या अभिनेत्री रुमा गुहा, या कारणामुळे झाला होता घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 7:48 PM

रुमा गुहा या किशोर कुमार यांच्या पत्नी असण्यासोबतच त्यांची एक वेगळी ओळख होती.

ठळक मुद्देरुमा यांना घर आणि करियर या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या होत्या. पण त्यांनी घर सांभाळावे अशी किशोर कुमार यांची इच्छा होती आणि त्याचमुळे त्यांच्यात प्रचंड भांडणं व्हायला लागली आणि त्यांनी १९५८ मध्ये घटस्फोट घेतला.

किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रुमा गुहा ठाकूरता उर्फ रुमा घोष यांचे काल निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. कोलकात्यातील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रुमा गुहा या किशोर कुमार यांच्या पत्नी असण्यासोबतच त्यांची एक वेगळी ओळख होती. त्या एक चांगल्या अभिनेत्री, गायिका होत्या. एवढेच नव्हे तर सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जात असत. कोलकतामधील तरुण गायकांसाठी त्यांनी एक संस्था देखील स्थापन केली होती. किशोर कुमार आणि त्यांनी लग्नाच्या केवळ आठ वर्षांनंतर घटस्फोट घेतला होता. त्यांच्या घटस्फोटाचे कारण काय होते याविषयी किशोर कुमार यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.

रुमा गुहा या सत्यजित रे यांच्या भाची होत्या. १९५० मध्ये किशोर कुमार आणि त्यांचे मुंबईत धुमधडाक्यात लग्न झाले होते. लग्नाच्या दोनच वर्षांत त्यांना अमित हा मुलगा झाला. पण अमितच्या जन्मानंतर काहीच वर्षांत त्यांच्यात दुरावा निर्माण व्हायला लागला. रुमा यांना घर आणि करियर या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या होत्या. पण त्यांनी घर सांभाळावे अशी किशोर कुमार यांची इच्छा होती आणि त्याचमुळे त्यांच्यात प्रचंड भांडणं व्हायला लागली आणि त्यांनी १९५८ मध्ये घटस्फोट घेतला. रुमा यांनी त्यानंतर अभिनयक्षेत्रात आपले भाग्य आजमावले. त्या सर्वात शेवटी २००६ साली प्रदर्शित झालेल्या द नेमसेक या हॉलिवूड चित्रपटात झळकल्या होत्या.

किशोर कुमार यांनी अनेक वर्षांपूर्वी प्रितीश नंदी यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, रुमा या खूप हुशार होत्या. पण जीवनाकडे बघण्याचा आमच्या दोघांचा दृष्टीकोन वेगळा होता. त्यांना त्यांच्या करियरमध्ये लक्ष केंद्रित करायचे होते. पण मला माझे घर सांभाळणारी व्यक्ती हवी होती. मी एका साध्या गावातील मुलगा आहे. त्यामुळे स्त्रियांनी करियर करणे ही गोष्टच मला कळत नाही. आपले घर कसे बनवायचे हे त्यांनी पहिल्यांदा शिकणे गरजेचे आहे. दोन्ही गोष्टी कशा काय सांभाळल्या जाऊ शकतात. या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. याच कारणामुळे आम्ही दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले होते.  

टॅग्स :किशोर कुमार