Join us

गौरी लंकेशच्या हत्येचा कमल हासनकडून निषेध; म्हटले, बंदुकीने एखाद्यास शांत करून मिळविलेला विजय सर्वात वाईट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 07:50 IST

प्रसिद्ध अभिनेता कमल हासनने गुरुवारी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला. कमल यांनी ...

प्रसिद्ध अभिनेता कमल हासनने गुरुवारी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला. कमल यांनी म्हटले की, ‘बंदुकीच्या गोळीने एखाद्यास शांत करणे हा एखाद्या चर्चेवरील तोडगा असूच शकत नाही.’ कमल यांनी ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले की, ‘बंदुकीने एखाद्याचा आवाज शांत करून वाद-विवादात जिंकणे हा सर्वात वाईट विजय आहे. गौरी यांच्या निधनामुळे दु:खी असलेल्या सर्व लोकांबरोबर माझ्या संवेदना आहेत.’ काही दिवसांपूर्वीच अभिनेता कमल हासन यांनी एक राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे संकेत दिले होते. त्याचबरोबर त्यांनी हेदेखील स्पष्ट केले होते की, मी दक्षिणपंथी संघटनांना सहकार्य करणार नाही. गेल्या मंगळवारी रात्रीच्या सुमारास पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर त्यांच्या बंगळुरूस्थित घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. गौरी यांच्या हत्येचे संपूर्ण देशात आता पडसाद उमटत आहेत. जागोजागी त्यांच्या हत्येचा निषेध केला जात असून, मारेकºयांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, कमल हासन यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, जावेद अख्तर, शेखर कपूर आदी बॉलिवूड सेलिब्रिटींनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्याचबरोबर संपूर्ण देशात सध्या या हल्ल्याचा निषेध केला जात असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र दक्षिणपंथी राजकारण्यांच्या समर्थकांचा सूर काही वेगळाच असून, त्यांनी कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन केले आहे. दिवंगत पत्रकार गौरी लंकेश या धर्मनिरपेक्षता आणि प्रगतशील मूल्यांवर विश्वास ठेवत असत. त्यामुळे त्या दक्षिणपंथी विचार आणि राजकारण्यांच्या मुख्य टीकाकार होत्या.